श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : बेलापूर खुर्द ते केशव गोविंद बन या तिर्थस्थळाच्या डांबरी पृष्ठभागाचे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. सदरचे काम अत्यंत निकृष्ट होत आहे. तसेच बेलापूर ते राहुरी फॅक्टरी रस्त्याच्या वर्षभर डागडुजीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असताना नियमित डागडुजी केली जात नसल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा टॅक्सी असोशिएशनचे अध्यक्ष सुनिल मुथ्था यांनी केला आहे. याबाबतच्या प्रसिध्दी पञकात मुथ्था म्हणाले की, सध्या बेलापूर खुर्द ते केशव गोविंद बन रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
वास्तविक डांबरीपृष्ठभागाचे नुतनीकरण करताना रस्त्याच्वरील खड्डे खडी व डांबराचा वापर करुन ग्राउंटिंग करुन मगच डांबरीकरण करावे लागते. मात्र तसे न करता फक्त खडी भरुन खड्डे बुजविले जात आहेत. यामुळे आत्ताच हा रस्ता उखडला आहे. त्यावर डांबरीकरण करणे म्हणजे केवळ दिखावा ठरणार आहे. खरे तर संबंधित अधिकार्यांनी यावर नियंत्रण राखणे आवश्यक आहे. याकडे अधिकार्यांनी डोळेझाक करणे संशयास्पद आहे. याचप्रमाणे बेलापूर ते राहुरी फॅक्टरी रस्याचेही नुतनीकरण केले गेले. त्यात वर्षभर मेन्टेनन्स संबंधित ठेकेदाराने करावे असे स्पष्ट केले आहे व ते बंधनकारक आहे.असे असताना नर्सरी नजिक सदर रस्ता उखडला आहे. या रस्त्याचे काम त्वरीत करण्याची मागणी होत आहे.