अजिंठा; पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील अजिठा, अनाड गावासह परिसरात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा, पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. काढणीला आलेला गहू अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे पूर्णतः जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरिपणाचा फटका बसत आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाने शेतकरी होरपळत आहेत. गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, मुबलक पाण्यावर शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, सिड्स कांदा, मका आदी रब्बी पिकांची लागवड केली. सध्या ही पिके सोगणीस आली आहे. तर काही ठिकाणी सोंगणी सुरु आहे. दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेकांनी गहू हरभरा काढणीला सुरुवात केली आहे. तर अनेकांची पिके शेतात उभी आहेत. बुधवारी रात्री झालेल्या पावसाच्या तडाख्याने गव्हाचे पीकाचे मोठे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त पिकाची कृषी विभागातर्फे लवकरात लवकर पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा