Aurangabad : औरंगाबादेत रेड्याचा जंगी वाढदिवस! महागातला केक अन् ७०० जणांचे जेवण | पुढारी

Aurangabad : औरंगाबादेत रेड्याचा जंगी वाढदिवस! महागातला केक अन् ७०० जणांचे जेवण

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबादमधील (Aurangabad) एका पशुपालकाने मोठ्या जल्लोषात रेड्याची मिरवणूक काढली. हा सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. वाढदिवसाचे होर्डिंग, ड्रायफ्रुटचा केक आणि खास पुण्याहून आलेल्या बँण्ड्च्या तालावर थिरकत राजाबाजार ते श्री संस्थान गणपतीपर्यंत भव्य मिरवणूक काढत जल्लोष केला. मोठ्या थाटा-माटात एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे सूरज रेड्याचा जंगी वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे जालना, नांदेडसह शहरातून ७०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांना मेजवानीही देण्यात आली.

औरंगाबादमधील (Aurangabad) अहिर गवळी समाजाचे शंकरलाल पहाडिया हे या रेड्याचे मालक आहेत. ते अगदी मुलाप्रमाणेच या सूरज नावाच्या रेड्याचा सांभाळ करीत आहेत. त्याला रोज सकाळ आणि संध्याकाळ दोन-दोन लिटर दूध, रोज चार किलो सरकी पेंड, दोन किलो गहू भरडा, महिन्याला पाच हजारांचा कडबा असा खुराक मिळतो असे दर महिन्याला १० ते १२ हजार रुपये ते रेड्यावर खर्च करतात. रेड्यांसाठी त्यांनी स्वतंत्र वाडा बांधला आहे.

रेड्यावरील प्रेमापोटीच पहाडिया यांनी याचा दुसरा वाढदिवस जंगी स्वरूपात साजरा केला. त्यासाठी शहरात बॅनर देखील लावले होते. चौका-चौकात झळकलेल्या बॅनरनंतर या वाढदिवसाची चर्चा सुरू झाली होती. विशेष म्हणजे या अनोख्या वाढदिवसासाठी नांदेड व जालन्यातून ५० पाहुणे आले होते. पाहुण्यांसाठी व्हेज पुलाव, बिर्याणी कचुंबर तयार करून ७०० च्या जवळपास पाहुण्यांना मेजवाणी देण्यात आली.

सूरज रेड्यावर आमचा जीव

अहिर गवळी असल्याने पशुपालन आणि दुध व्यवसाय आहे. गाई, म्हशीवर आमचा जीव असतो. सूरज रेड्याचा मागील दोन वर्षांपासून मुलाप्रमाणे सांभाळ करत असल्याने त्याचा दुसरा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याची इच्छा होती. त्या प्रमाणे आम्ही जंगी वाढदिवस साजरा केला.
– शंकरलाल पहाडिया, सूरजचे मालक- राजाबाजार

हेही वाचा

Back to top button