५३० वर्षांची परंपरा जोपासत सारंगवाडी येथे १५० क्‍विंटल भाजीचा महाप्रसाद; दीड लाख भाविकांची उपस्थिती | पुढारी

५३० वर्षांची परंपरा जोपासत सारंगवाडी येथे १५० क्‍विंटल भाजीचा महाप्रसाद; दीड लाख भाविकांची उपस्थिती

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील विरशैव समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या सारंगस्वामी यांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. शिरडशहापूर जवळील सारंगवाडी येथील या यात्रा महोत्सवानिमित्त परंपरागत भाजीचा महाप्रसाद कार्यक्रम पार पडला. कोरोनानंतर जवळपास दोन वर्षानंतर भरलेल्या या यात्रेत भाविक मोठ्या उत्साहाने सामील झाले. यावेळी जवळपास दीड लाखाहून अधिक भाविकांनी भाजीचा प्रसाद घेतला.

यावर्षी १५० क्‍विंटल भाजी प्रसादाचे वाटप करण्यात आले. यात विविध प्रकारच्या २० भाज्यांचा समावेश होता. पूर्वी परिसरात सारंगस्वामी महाराजांनी भाजीच्या प्रसादाची परंपरा सुरू केली होती. ते स्वतः भाजी तयार करून येथे आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करीत असत. स्वामींची हीच परंपरा ५३० वर्षापासून येथे आजही जोपासली जात आहे.

परिंचे : भक्तांना श्रीनाथांच्या यात्रा उत्सवाची ओढ

येथे आलेल्या भाविकांना भाजीचा प्रसाद वाटप करण्यात येतो. भाजीमुळे वर्षभर रोगराई होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या भाजीत टमाटर, वांगी, चवळी, दोडके, उसाचे टिपरू, पालक, शेपू, मेथी, चुका, पानकोबी, फुलकोबी, सिमला मिरची, हिरवी मिरची, कांदे, गाजर, गवार, काकडी, हरभरा, करडी आदी वीस प्रकारच्या भाज्यांचा समावेश होतो. या सर्व भाज्या एका जागी मिसळून मोठ्या कढईमध्ये शिजवून त्यात तेल, मीठ, मसाला टाकून भाजी तयार करण्यात येते.

सांगोल्यात २२ जानेवारीपासून अंबिका देवी यात्रा

कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदा जवळपास दीड लाखाच्या वर भाविक सहभागी झाले होते. महामंडळ वसमत यांनी येणार्‍या भाविकांसाठी एसटी बसची सुविधा पुरवली होती. तसेच महाप्रसाद भाजी सोबत उज्ज्वलाताई तांभाळे यांनी पोळ्याचे वाटप ठेवले होते. या यात्रेत विभुती, माळी, पोथ्या व पुजेच्या साहित्याच्या दुकानासह खाऊचे दुकाने, इलेक्ट्रॉनिक खेळणीचे साहित्य, सौंदर्य प्रसाधन, भांड्याच्या दुकानासह हॉटेल आदी दुकाने मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्याने यात्रा फुलली होती. यात्रे दरम्यान, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हे ही नक्की वाचा 

 

Back to top button