ब्लॉग : म्हसा यात्रा अन् हवेत फुगे फोडण्याची मजा | पुढारी

ब्लॉग : म्हसा यात्रा अन् हवेत फुगे फोडण्याची मजा

डोंबिवली: भाग्यश्री प्रधान-आचार्य : गावाकडच्या यात्रेला जात असे. मात्र, गाव सुटलं आणि यात्राही मागेच राहिल्या. कामानिमित्त अनेक ठिकाणी जाणे होते. पण यात्रेत जाण्याचा योग खरं तर खूप वर्षांनी आला होता. बैलांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असणारी म्हशाची यात्रा ओळखली जाते. कल्याण पासून काही किलोमीटरवर असणाऱ्या मुरबाड जवळील म्हसा या गावात ही यात्रा भरते. त्यासाठी सर्व पत्रकार मित्र मैत्रिणी कल्याणहून म्हसा येथे जाण्यास निघालो. तासाभरात तिथे पोहोचलो. आणि यात्रा बघून प्रवासाचा शीण निघून गेला.

विक्रेत्यांनी छोटी छोटी दुकाने थाटली होती. या दुकानात मातीने बनवलेल्या आणि सुंदर रंगवलेल्या बैलाच्या सुबक मूर्ती होत्या. इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज, ढाल – तलवार अशा देखील प्रतिकृती विक्रीसाठी ठेवल्या होत्या. ही सगळी दुकाने पाहत पाहत यात्रेचे मुख्य ठिकाण असलेले खांबलिंगेश्वर आणि म्हसोबाच्या देवस्थानाजवळ येऊन थांबलो. खरं तर देवस्थानाच्या आजूबाजूला असणाऱ्या मिठाईच्या दुकानाकडे आपसूकच पावले वळली. मात्र, आधी दर्शन घेऊन येऊया आणि मग जामुनवर ताव मारुया, असे ठरले.
पहिला दिवस असल्याने भक्तांची दर्शनासाठी रांग लागली होती. मात्र दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न झाले. म्हसोबावर निस्सीम भक्ती असणारे अनेक भाविक तेथे भेटले. त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले. त्यानंतर तेलवणे यांच्या दुकानाकडे वळलो. येथे असणारा माव्याचा खाजा आणि विशेष पद्धतीने केलेले जामून खाऊन मन तृप्त झाले.

यात्रेत विविध आकर्षक अभूषणांची दुकाने लागली होती. शेतीची अवजारे विकणारे विक्रेते होते. विशेष म्हणजे विविध रंगांनी रंगवलेल्या टोपल्या आणि काठ्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या. बैल विकत घेतल्यानंतर त्यांना सजवण्याचे साहित्य देखील विक्रीसाठी ठेवले होते. उंच आकाशाला गवसणी घालणारे आकाश पाळणे, टोराटोरा, हवेत उंच जाणारी बोट, याठिकाणी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. आकाशात उडणारे फुगे तर लहान झाल्यासारखे मीही विकत घेतले आणि ते हवेत उडवून फोडण्याची मजा खूप वर्षांनी पुन्हा एकदा अनुभवली.
अनेकांनी पिपाण्या वाजवत यात्रेची रंगत आणखी वाढवली होती. कोणी माझा बैल छान आहे, घ्या की हो दादा, असे म्हणत आपल्या बैलाची बोली लावत होते. तर कोणी त्या बैलाची बोली तोडण्यात दंग होते. कोणी शर्यतीत हा बैल कसा धावेल, याचा विचार करत होते. तर कोणी बैलाला विकत घेतल्यानंतर त्याला गुलाल फासून लगबगीने घरी जाण्याच्या तयारीत होते.

मध्येच एखादा तमाशाचा फड दिसून येत होता. पूर्वीसारखी मजा नाही अशी या फडातून बाहेर पडणारी माणसे बोलत होती. या फडात 50 रुपयाला तीन गाणी लावली जात होती. पेरू, गुलाबी, पिवळ्या रंगाचे बुढी के बाल, उकडलेल्या वालाच्या शेंगा, मका अशा विविध खाण्याच्या गोष्टीची मजा घेत जड पावलांनी आम्ही या यात्रेचा निरोप घेतला. पुढल्या वर्षी पुन्हा या यात्रेला येण्याचा निश्चय केला.

हेही वाचलंत का ? 

 

 

Back to top button