जालना : घराच्या गच्चीवर फुलवली स्ट्रॉबेरीची शेती; महेश गायकवाडचा अभिनव प्रयोग (Strawberry Farming In Jalna ) | पुढारी

जालना : घराच्या गच्चीवर फुलवली स्ट्रॉबेरीची शेती; महेश गायकवाडचा अभिनव प्रयोग (Strawberry Farming In Jalna )

जालना; पुढारी वृत्तसेवा : स्ट्रॉबेरीचे नाव घेतले की आठवते केवळ महाबळेश्वर! मात्र जालना शहरातील एका चोवीस वर्षीय तरूणाने आपल्या घराच्या गच्चीवरच स्ट्रॉबेरीची शेती (Strawberry Farming In Jalna) फुलवून फळ विक्रीची सुरूवात केली आहे. स्ट्रॉबेरीची शेती फुलवण्याचा हा जालना जिल्ह्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग आहे.

महेश पावलस गायकवाड असे या तरूणाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह औद्योगिक वसाहतीतील शासकीय निवासस्थानात राहतो. पावलस गायकवाड हे औद्योगिक विकास महामंडळात नोकरी करतात. जालना तालुक्यातील रेवगाव हे त्यांचे मूळ गाव. महेशने संगणकीय विज्ञान पदवी संपादन केली आहे. रेवगाव येथे गायकवाड परिवाराची तीन एकर शेती  (Strawberry Farming In Jalna) आहे.

जालना शहरातील नामांकित अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर महेशला फळबाग शेतीचे आकर्षण वाटले, मराठवाड्यात आंबा, द्राक्ष, मोसंबी, डाळींब आदी फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र स्ट्रॉबेरीची शेती कुणीही केलेली नाही, किंवा करण्याचा प्रयत्न करणार नाही, अशी खात्री झाल्यानंतर त्याने स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने समाज माध्यमाची मदत घेतली. गुगल सर्च करून महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीची शेती कशी करतात, तापमान किती लागते, याचा बारकाईने अभ्यास केला. मराठवाड्यातील तापमान हे महाबळेश्वरच्या तापमानापेक्षा आठ अंशाने अधिक असते. स्ट्रॉबेरीसाठी हलकी जमीन लागते, ओलावा लागतो, याची माहिती जाणून घेतली.

Strawberry Farming In Jalna : विंटर डाऊन जातीची स्ट्रॉबेरीची रोपांची लागवड

स्ट्रॉबेरीची शेती करण्याबाबत महेशने घरी आई- वडील यांना सांगितले असता त्यांनी विरोध केला. स्ट्रॉबेरीची शेती करायचीच हा पक्का इरादा केलेल्या महेशने महाबळेश्वर येथे संपर्क साधून मराठवाड्यातील वातावरणात स्ट्रॉबेरीसाठी कोणत्या जातीचे रोप योग्य राहील, याबाबत विचारणा केली. महाबळेश्वर येथे तापमान कमी असल्याने तेथे नाबेला व स्वीट चार्ली या जातीची स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मराठवाड्यातील तापमान हे महाबळेश्वरच्या तुलनेत आठ अंशाने अधिक असल्याने मराठवाड्यात विंटर डाऊन या जातीची स्ट्रॉबेरीची शेती करता येईल, असे त्याला सांगण्यात आले. महेशला त्याच्या मामाचा मुलगा अनुग्रह पाखरे यांने प्रोत्साहन दिले, अनुग्रह हा आठ वर्षाचा आहे.

घराच्या गच्चीवर फुलवली स्ट्रॉबेरीची शेती

स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा ठाम निश्चय झालेल्या महेशने महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची चारशे रोपे (विंटर डाऊन जातीची) तीन महिन्यांपूर्वी मागवली. घरी रोपे येईपर्यंत घरचे विरोध करीत होते. शेवटी या रोपांचे करायचे काय? याचे उत्तर महेशने स्वतः च शोधले. घराच्या गच्चीवर त्याने स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा निर्णय घेतला. सहाशे स्क्वेअर फूटमधील गच्चीवर अनुग्रह पाखरे याच्या मदतीने स्ट्रॉबेरीची चारशे रोपे लावून टाकली. या रोपांना शॉवरने पाणी दिले, शिवाय रोप वाढीसाठी सेंद्रीय खतांचा वापर केला. स्ट्रॉबेरीच्या झाडाला हिवाळ्यातच फळे येतात, पानगळ झाल्यानंतर पुन्हा पालवी फुटते. गेल्या महिन्यापासून स्ट्रॉबेरीच्या झाडाला मोठ्या प्रमाणात फळे आली असून ती परिपक्व होत आहेत. कुतूहल म्हणून त्याने आपल्या मित्र कंपनीला गच्चीवर फुलवली स्ट्रॉबेरीची शेती दाखवून फळेही चाखायला दिली आहेत. काही जण त्याच्याकडून स्ट्रॉबेरी विकत घेऊन जात आहेत. आग ओकणाऱ्या भागात महेशने जोपासलेली स्ट्रॉबेरीची शेती कौतुकाचा विषय ठरला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button