औरंगाबाद : निवडणूक वादातून राष्ट्रवादीच्या युवा जिल्हा अध्यक्षावर प्राणघातक हल्ला | पुढारी

औरंगाबाद : निवडणूक वादातून राष्ट्रवादीच्या युवा जिल्हा अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

पैठण; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. ही घटना शनिवारी (दि.३१) रात्री ११ वाजता घडली. भाऊसाहेब तरमळे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. या घटनेमुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

या हल्ल्यात विकास भाऊसाहेब लोखंडे, भाऊसाहेब बाबुराव लोखंडे, शकुंतला भाऊसाहेब लोखंडे, (चोघे रा. बोकुड जळगाव, ता.पैठण) आणि ओंकार रामदास निर्मळ (रा जांभळी ता.पैठण) हे जखमी झाले आहेत.

या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात दोन गटांच्या परस्पर तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी तपास सुरू केला आहे. हल्ला करणारे अनिकेत अशोक नागे, राजू बनकर, आकाश अशोक नागे, दिनेश राठोड, अशोक रामनाथ नागे, सुनील रूपचंद खरात, पांडुरंग भागचंद नागे (सर्व रा. बोकुड, जळगाव) या संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नुकत्याच झालेल्या पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव ग्रामपंचायती निवडणुकीत सरपंचपदावर भाऊसाहेब तरमळे यांच्या मातोश्री विजय झाल्या आहेत. या रागातून विरुद्ध गटातील अनिकेत् नागे यांनी शनिवारी रात्री ११ वाजता वाद उकरून काढला. यानंतर धारदार शस्त्राने तरमळे यांच्या मानेवर वार केला. घाव वर्मी लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तरमळे यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी भाऊसाहेब बाबुराव लोखंडे यांनी तक्रार दिली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button