परभणी : 'त्या' हल्ल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी

परभणी : 'त्या' हल्ल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे माजी नगरसेवक, ह.भ.प. मनोहर महाराज केंद्रे यांच्यावर गुरूवारी (दि.३) रात्री गंगाखेड परळी रस्त्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. संत जनाबाई देवस्थानात लावण्यात आलेल्या पाटीवरून वाद झाल्यानंतर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी मनोहर महाराज केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिकची माहिती अशी की, मनोहर महाराज केंद्रे यांनी त्यांच्या नावाची पाटी २०२० मध्ये संत जनाबाई देवस्थान कार्यालयात लावली होती. ही पाटी रत्नाकर गुट्टे, बाबा संभाजी पोले आणि हनुमंत लटपटे यांनी काढून टाकली. यानंतर या पाटीवरून मोठा वाद झाला होता.

मनोहर केंद्रे हे १ डिसेंबरला कामानिमित्त व्यकंट महाराज यांच्या बनपिंपळा येथील गोशाळेला भेट देण्यासाठी गेले होते. व्यंकट महाराज यांची भेट घेऊन मोटारसायकलवरून परत येत असताना हॉटेल मंथन येथे संजय धुळे यांचा वाढदिवस साजरा केला. यानंतर जनाबाई हॉटेलनजीकच्या राठोड पेट्रोलपंपाजवळ महाराज आले असता दुसर्‍या मोटारसायकलवर हनुमंत लटपटे, बाबा पोले आले व बाबा पोले यांनी हातातील लोखंडी रॉडने मनोहर महारांजाना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हभप मनोहर महाराज केंद्रे यांच्या फिर्यादीवरून हनुमंत लटपटे, बाबा पोले यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button