हिंगोली : बस-दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जखमी | पुढारी

हिंगोली : बस-दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जखमी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जांभरुन आंध ते भोसी मार्गावर जांभळीफाट्या जवळ भरधाव बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी असल्याची घटना शुक्रवारी (दि.२) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मारोती खोबराजी जुमडे (रा. जांभरूनआंध) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

जांभरुन आंध येथील मारोती जुमडे व त्यांचे मित्र सुरज प्रकाश जुमडे हे दोघे शुक्रवारी (दि.२) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकी वाहनावर जांभरून आंध येथून भोसी येथे मासे आणण्यासाठी निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन जांभळीपाटी जवळ आले असता हिंगोली येथून खिल्लारकडे जाणाऱ्या बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात मारोती जुमडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरज जुमडे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लांडगे, जमादार बापुराव चव्हाण, वाढवे, चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी सुरज यास उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे. या अपघातानंतर बस चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button