Romelu Lukaku : लुकाकूकडून डगआउटची तोडफोड; विश्वचषकातून बाहेर पडल्याने अश्रूअनावर | पुढारी

Romelu Lukaku : लुकाकूकडून डगआउटची तोडफोड; विश्वचषकातून बाहेर पडल्याने अश्रूअनावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेल्जियमचा संघ कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकातून बाहेर पडला आहे. गुरुवारी (दि.१ डिसेंबर) रात्री क्रोएशियाकडून ०-० असा बरोबरीत राहिल्यानंतर तो स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी बेल्जियमला ​​कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक होते, परंतु संघाला एकही गोल करता न आल्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. त्यांचा स्टार स्ट्रायकर रोमेलू लुकाकूने गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या. यानंतर सोशल मीडियावर लुकाकूवर जोरदार टीका होत आहे. (Romelu Lukaku)

काल झालेल्या सामन्यात इडन हॅझार्ड आणि रोमेलू लुकाकू प्लेइिंग इलेव्हनमध्ये नव्हते. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. मध्यंतरानंतर लुकाकूला ड्राईस मार्टेन्सचा पर्याय म्हणून मैदानात उतरवण्यात आले. त्यानंतर संपूर्ण सामन्यात लुकाकू संघासोबत राहिला. त्याला गोल करण्याच्या तीन संधी मिळाल्या होत्या. परंतु त्याला गोल करण्यात अपयश आले. (Romelu Lukaku)

यापैकी सामन्याच्या ९० व्या मिनिटाला मिळालेली संधी सर्वात सोपी होती. क्रोएशियाचा गोलरक्षक गोलपोस्टपासून दूर होता. चेंडू थेट लुकाकूच्या समोर आला. हेडर मारण्याऐवजी, त्याने छातीच्या सहाय्याने बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचे बॉलवरील नियंत्रण सुटल्याने त्याला गोल करता आला नाही. याचा फायदा घेत क्रोएशियन गोलकीपरने येऊन सहज चेंडू पकडला.

लुकाकू रडला ढसाढसा

सामना संपल्यानंतर लुकाकू खूपच निराश दिसत होता. त्याने सहाय्यक प्रशिक्षक थियरी हेन्रीला मिठी मारली आणि बराच वेळ रडला. यानंतर तो जड पावलांनी डगआऊटकडे निघाला. तिथे जाऊन त्याने डगआऊटची काच फोडत राग काढला. बेल्जियमचा संघ गेल्या वर्षी विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहोचला होता. तेथे त्यांचा फ्रान्सकडून पराभव झाला. त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात बेल्जियमने इंग्लंडचा २-० असा पराभव केला होता.

‘गोल्डन जनरेशन’चे स्वप्न भंगले

बेल्जियम संघात अनेक स्टार खेळाडू आहेत. कर्णधार एडन हॅझार्ड, केविन डी ब्रुयन, स्टार स्ट्रायकर रोमेलू लुकाकू आणि गोलकीपर थिबॉट कोर्टोइस यांच्यासह अनेक स्टार खेळाडू आहेत. त्यामुळे या संघाला बेल्जियमच्या फुटबॉल इतिहासात ‘गोल्डन जनरेशन’ म्हटले गेले. याच गोल्डन जनरेशनचा सदस्य असलेल्या रोमेलू लुकाकूने या सामन्यात अनेक चुका केल्या. गोल करण्याच्या तीन सोप्या संधी त्यांनी गमावल्या. बेल्जियमच्या ‘गोल्डन जनरेशन’ मधील या टीममधील खेळाडूंचे वय झाल्याचे केविन डी ब्रुयन याने स्वतः मान्य केले आहे. यातील अनेक खेळाडू पुढील विश्वचषकात खेळताना आपल्याला दिसणार नाहीत.

हेही वाचा;

Back to top button