बिडकीन (औरंगाबाद); प्रतिनिधी : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण दिनी मराठा क्रांती ठोक मोर्चाने मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा इशारा दिला होता. यावरुन पोलिस प्रशासनाने खबरदारीची भूमिका घेत शहर व ग्रामीण भागातील मराठा समन्वयकांची काल (गुरूवार) रात्री पासूनच धरपकड सुरू करुन त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले हाेते. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर प्रलंबित मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात आशी मागणी सातत्याने मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
मराठा समाजाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने देण्यात आला होता.
आंदोलनाच्या तयारीत असलेले मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक व स्वाभिमानी छावा मराठा संघटनेचे पदाधिकारी यांची काल रात्री पासून धरपकड करून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक किरण काळे पाटील व कृष्णा पाटील उघडे यांना पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. भागवत नागरगोजे, राजू चव्हाण, राम मारकळ यांनी ताब्यात घेतले होते.
तर बिडकीन येथे स्वाभिमानी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील मुरदारे, संतोष कुसेकर, दत्ता पाटील मोगल, विजय शेळके, आप्पासाहेब जाधव, अनिल कुटे, धनंजय चिरेकर, नारायण नरवडे, किशोर जाधव, गणेश जाधव हे सर्व पदाधिकारी आज सकाळी आठ वाजता वाहनातून झेंडे घेऊन औरंगाबादकडे आंदोलनाच्या तयारीत निघाले असतानाच बिडकीन पोलीस ठाण्याचे स.पो.नि.संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोरे, शिवानंद बनगे यांनी सर्व पदाधिकारी यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले.
यावेळी बिडकीन येथिल निलजगा फाट्यावर मराठा आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. मुख्यमंत्री ठाकरे हे औरंगाबाद शहरातील सर्व शासकीय दौरा आटोपून मुंबईला परत पोहोचतील तेव्हा मराठा आंदोलकांना सोडण्यात येईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आंदोलन तीव्र करणार…
मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात. सरकारने मराठा समाजाला खोटी आश्वासने देऊन आमची फसवणूक केली आहे. आम्ही सर्व पदाधिकारी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवणार होतो. मात्र सरकार पोलीस प्रशासनाला पुढे करून आंमच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आम्ही राज्यभरात तीव्र आंदोलन हाती घेतले असून, जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत एकाही मंत्री, खासदार, आमदाराला आम्ही जिल्ह्यात फिरकू देणार नाही. मराठा आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत.
किरण काळे पाटील (समन्वयक, मराठा क्रांती ठोक मोर्चा)