हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरात दरोडा टाकणाच्या उद्देशाने नांदेडहून ऑटोने आलेल्या सात जणांच्या टोळीपैकी चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या संशयीत आरोपींकडून २ गुप्ती, १ तलवार, लोखंडी रॉडसह मिरची पावडर जप्त करण्यात आली आहे. त्यांच्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आज (बुधवार) पहाटे गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे.
शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने नांदेड येथील काहीजण एका ऑटोने हिंगोलीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, शिवसांब घेवारे, जमादार सुनील अंभोरे, संभाजी लकुळे, किशोर सावंत, भगवान आडे यांच्यासह पथकाने काल (मंगळवार) रात्रीपासून या ॲटोचा शोध सुरु केला होता.
दरम्यान, ही ऑटो रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एनटीसी भागातील मोकळ्या जागेत अंधारात उभी असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने एनटीसीमध्ये धाव घेतली. पोलिसांनी ऑटोमध्ये बसलेल्या सात जणांची चौकशी सुरु केली. मात्र या चौकशीच्या वेळी तीनजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी ऑटोतील शेख वाहेद उर्फ मुन्ना, शेख परवेज शेख बाबु, शेख वसीम शेख सत्तार, धोंडीबा बालाजी सुर्यवंशी (सर्व रा. नांदेड) यांची चौकशी सुरु केली.
मात्र ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडून २ गुप्ती, १ तलवार, एक लोखंडी पक्कड, १०० ग्रॅम मिरची पावडर, एक दोरी जप्त केली आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तर मोहम्मद रशीद मोहम्मद सईद, राहुल रायबोळे व अन्य एकजण पळून गेला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपीनवार यांच्या तक्रारीवरून सात जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी फरार तिघांचा शोध सुरु केला आहे.
हेही वाचा :