‘होय, मीच मारले श्रद्धाला’; पॉलिग्राम चाचणीतून आफताबने दिली हत्येची कबुली

aftab poonawalla
aftab poonawalla
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याच्या पाॅलिग्राफ चाचणीतून मोठा खुलासा झाला आहे. चाचणी दरम्यान आफताबने आपल्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या मीच केल्याचे कबूल केले आहे. मात्र आफताबला श्रद्धाला मारल्याचा कोणताही पश्चाताप होत नसल्याचे आफताबने सांगितल्याची माहिती फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (FSL) अधिकाऱ्यांनी दिली आहे.

श्रद्धा हत्याप्रकरणी आफताबची गेले काही दिवसापासून पॉलिग्राफ चाचणी सुरू आहे. यासंदर्भात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराच्या अवयवांची जंगलात विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे. तसेच तो अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.

१ डिसेंबरला होणार नार्को टेस्ट

यानंतर श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबची (Shraddha Murder Case) नार्को टेस्ट देखील करण्यात येणार आहे. या टेस्ट करण्याची परवानगी दिल्ली पोलिसांना साकेत कोर्टाने दिली आहे. दिल्ली पोलिसांनी ही टेस्ट करण्याची परवानगी मागणारी याचिका कोर्टाकडे दाखल केली होती. कोर्टाच्या परवानगीनंतर १ डिसेंबरला आता आफताबची नार्को टेस्ट होणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

अशी होते पॉलिग्राफ टेस्ट

क्राईम सायकोलॉजी रिव्ह्यू नावाच्या संशोधन जर्नलनुसार, ही एक अशी चाचणी आहे जी सत्य जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके, श्वासोच्छवासातील बदल, घाम फुटणे आदी मानसिक प्रतिसादांचे मोजमाप करते. या चाचणीदरम्यान कार्डिओ-कफ्स अथवा संवेदनशील इलेक्ट्रोड यांसारखी उपकरणे संबंधित व्यक्तीला जोडलेली असतात आणि रक्तदाब, नाडी, रक्त प्रवाह यांच्यातील बदल त्याला प्रश्न विचारल्यावर मोजले जातात. ती व्यक्ती सत्य बोलत आहे की फसवत आहे अथवा अनिश्चित आहे हे निष्कर्ष काढण्यासाठी प्रत्येक प्रतिसादाला संख्यात्मक मूल्य दिले जाते.

अशी चाचणी १९व्या शतकात इटालियन क्रिमिनोलॉजिस्ट सिझरे लोम्ब्रोसो यांनी पहिल्यांदा केली होती. त्यांनी चौकशीदरम्यान गुन्हेगारी संशयितांच्या रक्तदाबातील बदल मोजण्यासाठी मशीनचा वापर केला होता. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ विल्यम मार्स्ट्रॉन यांनी १९१४ मध्ये आणि कॅलिफोर्नियाचे पोलिस अधिकारी जॉन लार्सन यांनी १९२१ मध्ये अशीच उपकरणे तयार केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news