उस्मानाबाद : पोलीस भरतीचा गोंधळ सुरूच; पोर्टल बंद असल्याने तरुणांमध्‍ये संताप! | पुढारी

उस्मानाबाद : पोलीस भरतीचा गोंधळ सुरूच; पोर्टल बंद असल्याने तरुणांमध्‍ये संताप!

लोहारा (उस्मानाबाद), पुढारी वृत्‍तसेवा : राज्य सरकारच्या पोलिस भरती परीक्षेकरिता अर्ज भरणारे पोर्टल बंद असल्याने अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे.  भरती प्रक्रिया सुरू होऊन आठ दिवस होत आहेत, मात्र अर्ज भरण्यासाठी असलेले पोर्टल बंद असल्याने उमेदवारांचे अर्ज भरले जात नाहीत. त्यामुळे तरुणांमधून संताप व्‍यक्‍त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस भरती प्रक्रिया बंद आहे.  आता भरती जाहीर झाल्‍यामुळे लाखो तरुण इंटरनेट कॅफे वर अर्ज भरण्यासाठी गर्दी करत आहेत;पण पोलीस भरती पोर्टल बंद असल्याने आठ दिवसांपासून तरुण चकरा मारत आहेत. पोर्टल सुरू करण्यासाठी गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. त्यामुळे युवकात असंतोष वाढत आहे. पोर्टल बंद असल्याने इच्छुकांची ऐनवेळी धावपळ उडाली आहे.
कोरोना काळामुळे वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढविण्यात आली असून, खुल्या जागेसाठी ३० व अन्य जागांसाठी ३३ वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आपला अर्ज दाखल होतो की नाही याची धास्ती उमेदवारात आहे. अनेक ठिकाणाहून प्रयत्न केले, मात्र अर्ज दाखल होत नसल्याने चिंता वाढत आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पोर्टल सुरू करावे आणि हे पोर्टल बंद का झाले? याची चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तरुणांमधून होत आहे.
.हेही वाचा  

Back to top button