भंडारा : चार एकरातील धानासह ट्रॅक्टर, मळणी यंत्र जळून खाक | पुढारी

भंडारा : चार एकरातील धानासह ट्रॅक्टर, मळणी यंत्र जळून खाक

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : धानाची मळणी करीत असताना अचानक ट्रॅक्टरला लागलेल्या आगीमुळे तब्बल चार एकरातील धानाच्या पुंजन्यासह ट्रॅक्टर व मळणी यंत्र जळून खाक झाले. ही घटना लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुज येथे आज (दि.१९) दुपारी घडली. शेषराव समरीत (रा. सरांडी) असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.  दिनेश हिरालाल ठाकरे (रा.सरांडी) असे नुकसानग्रस्त ट्रॅक्टर व मळणी यंत्र मालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेषराव समरीत या शेतकऱ्याने २० दिवसांपूर्वी आपल्या शेतातील धान पिकाची कापणी करून पुंजने तयार करून ठेवली होती.  आज (दि.१९) सकाळी धानाची मळणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुरू होती. यावेळी अचानक ट्रॅक्टरला आग लागली. ही आग मजुरांनी आणि ग्रामस्थांनी विझविण्याचा प्रयत्न केला. आगीने रौद्र रूप धारण केले. यात चार एकराच्या पुंजन्यासह ट्रॅक्टर व मळणी यंत्र जळून खाक झाले. या दुर्घटनेत धानाचे पुंजने, ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र असे एकूण ९ लाख १० हजार रुपयाचे नुकसान झाले. लाखांदूर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यासह ट्रॅक्टर मालकास नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button