हिंगोली : राहुल गांधी यांच्या ‘दिदी कैसे हो?’, या प्रश्‍नाने रस्त्यावर उभे धांडे दाम्पत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू | पुढारी

हिंगोली : राहुल गांधी यांच्या 'दिदी कैसे हो?', या प्रश्‍नाने रस्त्यावर उभे धांडे दाम्पत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा काँग्रेस नेते राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज (शनिवार) सकाळी आखाडा बाळापूर येथे पोहोचली. या ठिकाणी यात्रा पाहण्यासाठी रस्त्यालगत उभ्या असलेल्या साधना धांडे अन शिवा धांडे यांना बोलावून राहुल गांधींनी त्यांची चौकशी केली. ‘दिदी कैसे हो’, असे राहूल गांधी यांनी विचारताच साधना धांडे यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू उभे राहिले.

कळमनुरी तालुक्यातील दातीफाटा येथून सकाळी निघालेली यात्रा आखाडा बाळापुरात पोहोचली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विश्‍वजीत कदम, माजीमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, प्रा. वर्षा गायकवाड, अमित देशमुख आदी प्रमुख नेते यात्रेत सहभागी झाले होते. आखाडा बाळापूर येथे यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. ‘नफरत छोडो, भारत जोडो, वो तोडेंगे हम जोडेंगे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

या ठिकाणावरून माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व त्यांचे कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते. डोक्याला कोल्‍हापूरी फेटे बांधून सहभागी झालेले कार्यकर्ते यात्रेत चर्चेचा विषय बनले होते. सिंचन वसाहतीजवळ माजीमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह पदाधिकारी व कायर्कत्यांनी फेटे बांधून राहुल गांधी यांचे स्वागत केले. त्यानंतर कोल्हापूरकरांनी तेथील संस्कृतीचे दर्शन घडविले. यावेळी विविध खेळांचे प्रदर्शन घडविले. तसेच कुस्तीचेही प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. खासदार गांधी यांनी कुस्तीपट्टूंचे कौतूक केले. त्यानंतर हि यात्रा कळमनुरीकडे मार्गस्थ झाली.

आखाडा बाळापुरात शेवाळा रोड भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या साधना धांडे व शिवा धांडे यांना बोलावून राहुल गांधींनी त्यांची चौकशी केली. याबाबत साधना धांडे यांनी सांगितले की, राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा येणार हे माहिती होते. मात्र गांधी यांची भेट होईल असे स्वप्नातही वाटले नाही. आज (शनिवार) सकाळी यात्रेच्या स्वागताच्या निमित्ताने शेवाळा रोड भागात मी व माझे पती शिवा धांडे उभे होतो. यावेळी खासदार गांधी यांचे लक्ष गेले अन्‌ त्यांनी आम्हाला हात दाखवून बोलावले. मात्र एवढी मोठे व्यक्ती आम्हा सामान्यांना कशाला बोलावतील, असे म्हणून दुर्लक्ष केले. मात्र त्यांनी पुन्हा बोलावल्यानंतर थोडी भिती वाटली. पण, त्यांच्यापर्यंत पोहोचलो. राहुल गांधी यांनी ‘कैसे हो दिदी असे शब्द उच्चारताच तोंडातून शब्दही फुटेणासे झाले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

त्यांची झालेली भेट स्वप्नवतच आहे. मात्र हा अमुल्य ठेवा आम्ही आयुष्यभर जपणार असल्याचे साधना धांडे यांनी सांगितले. ॲटो चालक शिवा धांडे यांच्याशी संवाद साधतांना तुम्ही काय व्यवसाय करता, दिवसभरात किती रुपये मिळतात, असे प्रश्‍न राहुल गांधींनी विचारल्याचे शिवा धांडे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button