चंद्रपूर हत्याकांड : युवकाची हत्या करुन त्याच्या मुंडक्यासोबत फुटबॉल खेळणाऱ्या ८ मारेकऱ्यांना अटक | पुढारी

चंद्रपूर हत्याकांड : युवकाची हत्या करुन त्याच्या मुंडक्यासोबत फुटबॉल खेळणाऱ्या ८ मारेकऱ्यांना अटक

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : दुर्गापूर येथे एका (32 वर्षीय) युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणातील 6 मारेकरी व त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या 2 वाहनचालक अशा 8 संशयीत आरोपींना अवघ्या काही तासांतच स्थानिक गुन्हे शाखेने काल (मंगळवार) वर्धा जिल्ह्यातील आरंभा येथून पळून जात असताना अटक केली.

सोमवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास दुर्गापूर हद्दीतील एका बिअरबार व नायरा पेट्रोलपंपासमोर दुर्गापूर रोडवर पूर्व वैमन्यस्यातून अज्ञात 7 ते 8 मारेकऱ्यांनी (32 वर्षीय) महेश मेश्राम (रा. दुर्गापूर) या युवकाची धारधार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केली होती. इतकेच नाही तर मृत युवकाचे धडावेगळे केलेल्या मुंडक्यासोबत फुटबॉलचा खेळ खेळून क्रौर्याची परिसीमा पार केली होती.

या घटनेच्या रात्री मृत युवक मित्रांसोबत बिअरबार मध्ये गेला होता. त्याच्यावर पाळत ठेवून सात ते आठ मारेकऱ्यांनी प्रथम त्‍याला घेराव घातला. नंतर त्‍याची निर्घृणपणे हत्या केली. मारेकरी एवढ्यावरच थांबले नाहीत तर क्रुरपणे त्या युवकाचे मुंडके धडापासून वेगळे केले. त्या मुंडक्या सोबत फुटबॉलचा खेळ खेळून घटनास्थळापासून अंदाजे 50 मिटरवर फेकून ते पळून गेले होते. दुर्गापूर पोलिसांनी मृतदेह ( धड व मुंडके) ताब्यात घेवून अज्ञात मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता.

पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह यांनी अज्ञात मारेकऱ्यांना तात्काळ शोध घेण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोउपनी अतुल कावळे यांच्यासह अंमलदारांची चार विशेष शोध पथके गठीत झाली होती.
ही शोध पथके आरोपींच्या शोधात निघाली होती. चारही पथकांनी केलेल्या चौकशीत संशयीत आरोपी व त्यांच्या ठावठिकाण्याबाबत गोपनीय माहितीचा तांत्रिक तपास केला. मारेकरी हत्या करून जिल्ह्याबाहेर पळून जात असल्याची गोपनीय माहिती तपास पथकाला मिळाली.

सपोनी कापडे, सपोनी भोयर यांच्या पथकांनी पळून जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून स्कॉर्पिओ वाहनाला वर्धा जिल्ह्यातील आरंभा टोल नाका येथे अडविले. या वाहनात सर्व संशयीत आरोपी पळून जाण्याचा बेत आखून बसले होते. मोठ्या शिताफिने संशयीत आरोपी अतुल मालाजी अलीवार (वय 22) रा. समता नगर वार्ड क्र. 6 दुर्गापुर, दिपक नरेद्र खोब्रागडे (वय 18) रा. समता नगर वार्ड क्रं. 6 दुर्गापूर, सिद्धार्थ आदेश बन्सोड (वय 21) रा. नेरी दुर्गापूर, संदेश सुरेश चोखान्द्रे (वय 19) रा. सम्राट अशोक वार्ड क्रं. 2 दुर्गापूर चंद्रपूर, सुरज दिलीप शहारे (वय 19) रा. समता नगर वार्ड क्रं. 6 दुर्गापूर, साहेबराव उत्तम मलिये (वय 45) रा. नेरी समतानगर वार्ड क्रं. 6 दुर्गापूर, अजय नानाजी दुपारे ( वय 24) रा. उर्जानगर कोंडी दूर्गापुर व प्रमोद रामलाल सुर्यवंशी (वय 42) रा. उर्जानगर दुर्गापूर येथील रहिवासी असलेल्या आठ संशयीत आरोपींना स्कॉर्पिओ वाहनासह अवघ्या काही तासांत जेरबंद केले.

या प्रकरणातील सहा संशयीत आरोपींनी हत्या केली, तर दोन आरोपींनी चारचाकी स्कॉर्पिओ वाहन (एम. एच. 04 जी झेड 9091) ने पळून जाण्यास मदत केली. त्यामुळे आठही संशयीत आरोपींना अटक करण्यात आली.

हेही वाचा :  

Back to top button