हिंगोली : आखाडा बाळापूर परिसरात सट्टा बाजार तेजीत; पोलिसांकडून ठोस कारवाईची मागणी | पुढारी

हिंगोली : आखाडा बाळापूर परिसरात सट्टा बाजार तेजीत; पोलिसांकडून ठोस कारवाईची मागणी

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापूर व परिसरामध्ये झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेने हजारो तरुण सट्टा बाजार खेळत आहेत. त्यामुळे अनेक तरुणाचे आयुष्य बरबाद होत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. तर दुसरीकडे खुलेआम चालणाऱ्या या सट्टा बाजाराकडे पोलीस खात्याचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांत दबक्या आवाजात सुरु आहे.

आखाडा बाळापूर येथे क्रिकेट सामन्‍यावर  सट्टा बाजार खेळण्याकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षिला जात आहे. दररोज येथे लाखो रुपयांची उलाढाल एका क्रिकेट सामन्यावर होत आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्यामध्ये पाकिस्तान हरल्यास ६ हजार रुपयात १ लाख रुपये असा भावबुकी धारकांकडून काढण्यात आला होता. त्यादिवशी शेकडो तरुण आणि सट्टा व्यावसायिकांनी किमान दीड कोटीची उलाढाल केल्याची सर्वत्र चर्चा ऐकायला मिळत आहे.

सट्टा बाजारामध्ये लाखो रुपये हरल्यानंतर तरुणांनी गाव सोडले

आखाडा बाळापूरमध्ये सट्टा बाजारामध्ये लाखो रुपये हरल्यानंतर काही तरुणांनी गाव सोडून इतरत्र पलायन केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बुक्की धारकाचे देणे झाल्यामुळे अनेक जण व्यसनाधीनतेच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे शेकडे तरुणांचे संसार उघड्यावर आले आहेत.दरम्यान, या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अर्थपूर्ण व्यवहारात गुंतल्याचे चित्र आहे. त्यामुळे सट्टा खेळणाऱ्यांवर व बुकीधारकांवर अंकुश कोण लावणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये नुकतेच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर या व्यवसायाकडे लक्ष घालून कारवाई करणार का ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सट्टा बाजारावर पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button