गर्भगिरी डोंगरावर ढगफुटी ; लागवड केलेला कांदा गेला पुरात वाहून | पुढारी

गर्भगिरी डोंगरावर ढगफुटी ; लागवड केलेला कांदा गेला पुरात वाहून

मढी : पुढारी वृत्तसेवा :  मायंबा डोंगरावर सोमवारी रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने मढी परिसरातील तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. गर्भगिरी डोंगरातील पवनागिरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक शेतकर्‍यांच्या शेतात पाणी घुसून लागवड केलेला कांदा पुरात वाहून गेला. शेतात पीकच राहिले नाही, तर ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये कशाचे फोटो अपलोड करायचे, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. मढी, निवडुंगे, करडवाडी, घाटशिरस, धामणगाव या गावांत नदीसह रस्त्यांवर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकर्‍यांच्या कांदा, कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री बारा वाजता सुरू झालेला पाऊस मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत कायम होता. रात्री एक वाजता पावसाने रौद्र रूप धारण केले आणि अवघ्या पाच तासांत तलाव, नदीनाले भरले. मढीचा पाझर तलाव तुडुंब भरल्याने सर्वत्र महापुराचे स्वरूप आले. गावातील रस्त्यांनाही नदीचे स्वरूप आले होते. मढी-मायंबा, तिसगाव, मढी-निवडुंगे हे सर्व रस्ते बंद झाले होते. अनेक शेतकर्‍यांचे बांध फुटून नदीचे पाणी थेट शेतात घुसल्याने शेत वाहून गेले आहे.

नदीला आलेल्या पुराने शेतात पाणी घुसून शेतकर्‍यांनी लागवड केलेला कांदा वाहून गेला आहे. शेतात उभे असलेले बाजरी, तूर, उडीद, मूग, कपाशी मका ही पिके आडवी झाली आहेत. महागडे बियाणे, कांदा रोपवाटिकेचा खर्च व लागवडीच्या भरमसाठ मजुरीमुळे शेतकरी तोट्यात आला असून, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विहिरी भरून वाहत आहेत. पावसाने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पाहणी करून पंचनामे करावे, अशी मागणी युवा नेते अशोक मरकड यांनी केली आहे.

अ‍ॅपमध्ये कशाचे फोटो अपलोड करायचे?
ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये शेतकर्‍यांचा परिचय व पेरणी क्षेत्र फोटोसह अपलोड करायचे आहेत. काही ठिकाणी पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. कांदा, कापूस, सोयाबीन, फळबागांमध्ये कंबरेइतके पाणी आहे. त्यामुळे शेतात पीकच राहिले नाही, तर ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये कशाचे फोटो अपलोड करायचे, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

Back to top button