गोरेगाव, पुढारी वृत्तसेवा : आमच्या शेतजमिनी, गुरे, ढोरे, साहित्य विकत घ्या, असे म्हणत गारखेडा (ता. सेनगाव) ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रिला काढले आहे. गावाला भेडसावण्याऱ्या समस्यांबाबत अनेकदा लेखी तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील एक निवेदन १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकर्यांना विविध संकटाशी सामना करावा लागत आहे. शेतकर्यांवर अनेक संकटे घोंघावत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असताना शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीची मदत अद्यापही वाटप केलेली नाही. शिवाय विमा कंपनीनेही पीक विमा दिलेला नाही. गावातील वीज पुरवठा सुरळीत केला जात नाही. यासह अन्य समस्याही गावामध्ये भेडसावत आहेत. कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्यांना कर्जमाफी जाहीर करावी, खाजगी फायनान्सचे कर्ज माफ करावे, हिंगोली हा शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करावा आदी. मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोवर ग्रामपंचात बंद, शाळा बंद व मतदानावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.
हेही वाचा :