अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपनं माघार का घेतली?; चंद्रशेखर बावनकुळेंकडून मोठा खुलासा | पुढारी

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपनं माघार का घेतली?; चंद्रशेखर बावनकुळेंकडून मोठा खुलासा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मुंबईमधील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांच्या उमेदवाराचा अर्ज परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. अंधेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाने अर्ज परत घेत असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि.१७) नागपुरात केली.

या निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने माघार घेतल्यामुळे येथील निवडणूक आता बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेचे माजी आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणुकीत होत आहे. या निवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ऋतुजा लटके यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना (शिवसेनेचा शिंदे गट) आणि रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष अशा तिघांनी मिळून मुर्जी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपच्या कमळ चिन्हावर ही निवडणूक लढविणार होते.

एखाद्या लोकप्रतिनिधींचे निधन झाले असल्यास त्या परिवारातील कोणीही सदस्य निवडणूक लढवित असेल, तर महाराष्ट्राची संस्कृती म्हणून निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि राज्य नेतृत्वाने निर्णय घेऊन मुर्जी पटेल यांचा अर्ज परत घ्यावा, अशा सुचना दिल्या असल्याचे बावनकुळे यांनी आज नागपुरात सांगितले.

विधानसभेचा कार्यकाळ संपायला दीड ते दोन वर्ष बाकी असल्यामुळे ही निवडणूक लढवण्यापेक्षा 2024 मध्ये भारतीय जनता पक्ष या मतदारसंघातून निवडणूक लढवेल, असे बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असल्याचा बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button