नगर : ई-पीक नोंदणीस शनिवारपर्यंत मुदतवाढ | पुढारी

नगर : ई-पीक नोंदणीस शनिवारपर्यंत मुदतवाढ

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अडीच महिन्यांत जिल्ह्यातील 2 लाख 83 हजार 943 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांची मोबाईल अ‍ॅपव्दारे शेतकर्‍यांनी नोंदणी केली. एकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत ही नोंदणी फक्त 63.80 टक्के झाली. शंभर टक्के क्षेत्राची नोंदणी व्हावी, यासाठी ई-पीक पाहणीस 22 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. गेल्या वर्षापासून खरीप व रब्बी पिकांची सातबारावर ऑनलाईन नोंदणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार यंदा देखील ऑनलाईन पिकांची नोंदणी केली जात आहे. खरीप हंगामासाठी यंदा जिल्ह्यातील 4 लाख 45 हजार हेक्टर क्षेत्र लागवडीस निश्चित केले. यंदा शेतकर्‍यांनाच आपापल्या पिकांची मोबाईल अ‍ॅपव्दारे नोंदणी करण्याची सक्ती केली.

पहिल्या दीड महिन्यांत शेतकर्‍यांनी या नोंदणीकडे दुर्लक्ष केले. 9 ऑक्टोबरपर्यंत 1 लाख 67 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नोंदणी झाली होती. 15 ऑक्टोबर नोंदणीची डेडलाईन होती. त्यामुळे गेल्या 6 दिवसांत नोंदणी मोठया प्रमाणात झाली. 15 ऑक्टोबरपर्यंत 2 लाख 83 हजार 943 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांची नोंदणी झाली. त्यासाठी 2 लाख 63 हजार 665 शेतकर्‍यांनी मोबाईल अ‍ॅपचा वापर केला. अद्याप 36 टक्के खरीप क्षेत्रावरील पिकांची नोंदणी रखडली आहे. सातबारा उतार्‍यावर पिकांची नोंदणी झाली तरच शासकीय योजनांचा लाभ घेता येतो.त्यासाठी सातबारावर पिकांची नोंदणी महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य सरकारने ई-पीक पाहणी कार्यक्रमास 22 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

पीक नोंदणी झालेली हेक्टरी संख्या
अकोले 10170, नगर 17146, कर्जत 29019, कोपरगाव 24655, जामखेड 20532, नेवासा 14645, पाथर्डी 18354, पारनेर 22409, राहाता 20685, राहुरी 31122, शेवगाव 14049, श्रीगोंदा 15471, श्रीरामपूर 23506, 22175

Back to top button