जालना : परतीच्या पावसाने हाहाकार; सोयाबीन, कापूस पाण्यात | पुढारी

जालना : परतीच्या पावसाने हाहाकार; सोयाबीन, कापूस पाण्यात

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा: वडीगोद्री, गोंदी मंडळात विजेच्या कडकडाटासह चार तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काढणीस आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणीच पाणी झाले. कपाशीच्या शेतात ही मोठ्या प्रमाणात पाणी सचले असून वेचणीस आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसामुळे हिरावला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

सोमवारी रात्री गोंदी मंडळात ९५ मिमी तर वडीगोद्री मंडळात ७८ मिमी पाऊस पडला आहे. परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून एकाच रात्री नदी नाले वाहिले असून शेत शिवार जलमय झाले आहे. उशिरा का होईना, यंदा पिके जोमात आली होती. मात्र, परतीच्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले आहे. शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

फळबागाचे नुकसान; उसाच्या शेतात पाणी

परतीच्या पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले असून तोडणीस आलेल्या उसाच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे. ५ दिवसांत कारखाने सुरू होणार आहेत. आता पाऊस झाल्याने ऊस कारखान्याला नेताना अनेक अडचणी येणार आहेत. याचीही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. यामुळे आता ऊस तोडणी ही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button