बाळासाहेब ठाकरेंऐवजी मोदी,शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा: अमोल मिटकरींचा शिंदे गटाला खोचक सल्ला | पुढारी

बाळासाहेब ठाकरेंऐवजी मोदी,शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा: अमोल मिटकरींचा शिंदे गटाला खोचक सल्ला

बारामती; पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. शिवसेनेला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले आहे. असे असताना शिंदे गट ही बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची मागणी करून चिन्हाची मागणी करत आहेत. मात्र आमचे त्यांना आव्हान आहे की, बाळासाहेब ठाकरे ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करावी. तुम्हाला ताकद दिसून येईल, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाला लगावला.

आमदार अमोल मिटकरी मंगळवारी (दि. ११) बारामतीत आले होते.. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार मिटकरी म्हणाले की, जनसंघ, काँग्रेस या पक्षांनाही वेगवेगळी चिन्हे बदलावी लागली. त्यामुळे फारसा फरक पडला नाही. बाळासाहेब ठाकरे हे नाव ज्या ठिकाणी आहे. तेथे शिवसैनिकांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मशाल चिन्हालाच लोक पसंती देतील. मशाल हे जसे क्रांतीचे प्रतीक आहे. तसेच शिवसेनाही क्रांतीचे प्रतीक आहे. मित्रपक्ष म्हणून आमचा शिवसेनाला पाठिंबा असल्याचे मिटकरी यांनी सांगितले

शिवतारेंचे आता वय झाले
राष्ट्रवादीने शिवसेना संपवली असा आरोप शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला होता. यावर बोलताना मिटकरी म्हणाले की, याउलट माझा त्यांना प्रश्न आहे की, भावना गवळी, अडसूळ, प्रतापराव जाधव ही सर्व मंडळी ईडीच्या धाकाने शिंदे गटात जाऊन बसले. शिवतारे यांचे आता वय वाढले. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. असा घनाघात मिटकरींनी केला.

Back to top button