हिंगोली : 30 हजारांची लाच घेताना सरपंच अडकला जाळ्यात; लाचलुचपत विभागाने केली कारवाई | पुढारी

हिंगोली : 30 हजारांची लाच घेताना सरपंच अडकला जाळ्यात; लाचलुचपत विभागाने केली कारवाई

वारंगा फाटा; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथील सरपंचाला लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (४, ऑक्टो) दुपारी रंगेहाथ पकडले. पोल्ट्रीफॉर्म टाकण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून 30 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ओम कदम (रा. वारंगाफाटा) असे सरपंचाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नांदेड येथील एका व्यक्तीस वारंगा फाटा शिवारामध्ये पोल्ट्री फार्म उभारायचे होते. त्यासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यामुळे तक्रारदाराने वारंगाफाटा येथील सरपंच ओम कदम यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र त्यासाठी सरपंच कदम याने 30 हजार रुपयांची मागणी केली. सदर रक्कम मंगळवारी वारंगा फाटा येथे देण्याचे ठरले होते. या प्रकरणात तक्रारदाराने थेट हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यावरून लाचलुचपतचे उपधिक्षक निलेश सुरडकर, पोलीस निरीक्षक विजय पवार, प्रफुल्ल अंकूशकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद युनूस, जमादार विजय उपरे, तानाजी मुंडे, राजाराम फुफाटे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, विजय शुक्ला, महिला पोलीस कर्मचारी योगीता अवचार यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी वारंगाफाटा येथे सापळा रचला. दरम्यान ठरल्या प्रमाणे मंगळवारी दुपारी वारंगाफाटा येथे एका कृषी केंद्रात दुपारी सरपंच कदम याने 30 हजारांची लाच स्विकारताच यास रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

हेही वाचा

Back to top button