वाळकी : पळून गेलेले प्रेमी युगुल ताब्यात, मोबाईल लोकेशनमुळे शोध; बाल सुधारगृहात रवानगी | पुढारी

वाळकी : पळून गेलेले प्रेमी युगुल ताब्यात, मोबाईल लोकेशनमुळे शोध; बाल सुधारगृहात रवानगी

वाळकी, पुढारी वृत्तसेवा: एकमेकांच्या प्रेमात वेडे होऊन वीस दिवसांपूर्वी घरातून पळून गेलेल्या अल्पवयीन प्रेमी युगुलाला नगर तालुका पोलिसांनी दौंड तालुक्यातील यवत येथून ताब्यात घेतले आहे. मुलगा आणि मुलगी हे दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी नगरमधील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.नगर तालुक्यातील हातवळण येथील एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण

केल्याची तक्रार दि. 11 सप्टेंबर रोजी सदर मुलीच्या कुटुंबीयांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिली होती.
या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे करत होते.

तपासा दरम्यान सदर मुलीचे अपहरण नगर तालुक्यातील मठपिंप्री गावातील तरूणाने केले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या दोघांना शोधण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत तपास सुरु केला. त्या मुलाकडे असलेल्या मोबाईलची माहिती पोलिसांना मिळाली.

दोन दिवसांपूर्वी सदर मुलाच्या मोबाईलचे लोकेशन दौंड (जि. पुणे) जवळील यवत या ठिकाणी आढळून आले. त्यानंतर लगेच पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलिस नाईक आर.एस. खेडकर, घावटे, बांगर, सहाय्यक फौजदार घोरपडे यांचे पथक दौंडकडे रवाना झाले. रविवारी (दि.2) यवत परिसरात शोध घेऊन त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आमचे एकमेकांवर प्रेम असल्याने आम्ही दोघे घरातून पळून आल्याचे त्यांनी सांगितले. ते दोघेही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांना नगरला आणून त्यांची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे.

Back to top button