खासदार सुप्रिया सुळे यांची गावभेटीची धावपळ सुरूच | पुढारी

खासदार सुप्रिया सुळे यांची गावभेटीची धावपळ सुरूच

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: भाजपच्या केंद्रीय नेत्या, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौर्‍यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची सुरू असलेली गावभेटीची धावपळ थांबण्यास तयार नाही. सुळे यांनी बारामती तालुक्याच्या गाडीखेल, साबळेवाडी, शिर्सुफळ या गावांना भेट देऊन लोकांच्या अडचणी ऐकून घेतल्या.

महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर बारामती तालुक्यातील विकासकामे निधीअभावी रखडली असल्याने गाडीखेल येथील नागरिकांनी रखडलेली विकासकामे मार्गी लावावीत, याबद्दल सुळे यांना विचारले असता, ‘न्यायालयीन लढा चालू असून, रखडलेली सर्व विकासकामे पूर्ण करण्यात येतील,’ असे आश्वासन सुळे यांनी दिले. गावातील श्री शिरसाई विद्यालय हे शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी विद्या प्रतिष्ठानला जोडण्यात यावे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

गावातील सौरऊर्जा प्रकल्पात जी बाहेरील कामगारांची भरती होते, ती न होता इथून पुढे निघणार्‍या भरतीत स्थानिकांना संधी देण्यात येईल, असेही सुळे यांनी सांगितले. शिर्सुफळ येथील रेल्वे भुयारी मार्ग दुरुस्त करावा, यासाठी ग्रामस्थांनी निवेदन दिले. रेल्वेस्थानक, फलाटांची उंची वाढविण्यासाठी रेल्वे अधिकार्‍यांशी चर्च करून हा विषय जलद गतीने मार्गी लावण्यात येईल, असे सुळे यांनी सांगितले. सुळे यांनी शिरसाईदेवीचे दर्शन घेऊन पूजा केली. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, लीलाताई गावडे तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button