नवरात्र महोत्सवाची तयारी सुरू : तुळजापूर, माहूरमध्ये यंदा निर्बंधमुक्‍त उत्सव | पुढारी

नवरात्र महोत्सवाची तयारी सुरू : तुळजापूर, माहूरमध्ये यंदा निर्बंधमुक्‍त उत्सव

तुळजापूर / अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : नवरात्र महोत्सवाला येत्या २६ तारखेपासून प्रारंभ होत असून, मराठवाड्यात असलेल्या तुळजापूर, माहूर आणि अंबाजोगाई येथे या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. कोरोनामुळे दोन वर्ष उत्सव साजरा करता आला नव्हता. यंदा उत्सव निर्बंधमुक्‍त वातावरणात होणार असल्याने भाविक, विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

तुळजाभवानी मंदिरात घटस्थापनेला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर सपत्नीक नवरात्राचे यजमान राहणार आहेत. मंदिर परिसरात स्वच्छतेची कामे सुरू आहेत. तुळजाभवानी देवीची सध्या घोर निद्रा सुरू असून, येत्या सोमवारी मूर्ती पुन्हा मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात येईल. २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या नवरात्रातील दुसर्‍या तिसर्‍या आणि चौथ्या दिवशी देवीची नित्य उपचार पूजा संपन्न होईल आणि रात्री छबिना काढण्यात येईल.

३० सप्टेंबर पासून तुळजाभवानी देवीच्या नवरात्र काळात मांडण्यात येणार्‍या विविध पूजांना सुरुवात होईल. ३० ला मुरली अलंकार महापूजा बांधण्यात येणार आहे. १ ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा तर २ ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येईल. तीन ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी असल्यामुळे देवीला महिषासुर मंजूर मर्दिनी अलंकार महापूजा केली जाईल. याच दिवशी सकाळी साडेअकरा वाजता होमकुंडावरील वैदिक कार्यक्रमाला सुरुवात होईल. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता होमावरील धार्मिक विधी होतील. ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी असल्यामुळे तुळजाभवानी देवीचा नवरात्र महोत्सवातील महत्त्वाचा सोमोल्लंघन सोहळा होईल. सीमोल्‍लंघन झाल्यानंतर सकाळी सात वाजता तुळजाभवानी देवीच्या श्रमनिद्रेला सुरुवात होईल. भिंगार येथून आणलेल्या पलंगावर तुळजाभवानी देवीची ही निद्रा पाच दिवस चालते.

९ ऑक्टोबर या दिवशी कोजागिरी पौर्णिमा असून पहाटे दीड वाजता देवीची श्रमनिद्रा पूर्ण करून मूर्ती चांदीच्या मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात येईल. यानंतर तुळजाभवानीच्या धर्म दर्शनाला सुरुवात होईल. १० ऑक्टोबर रोजी सोलापूर येथील जगदंबा देवी मंदिरातून येणार्‍या मानाच्या काठ्या तुळजापुरात येतील. या काठ्यासोबत तुळजाभवानी देवीचा रात्री होणारा छबीना निघणार आहे. मंदिराच्या अध्यक्षा तहसीलदार योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी या काळात शारदे नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमांचे नियोजन करीत आहेत.

विविध कार्यक्रमांची रेलचेल

अंबाजोगाईची योगेश्वरी देवी ही प्रामुख्याने कोकणवासियांची कुलदेवता आहे. यंदा नवरात्रीत विविध सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. माहुरातही संस्थानने तयारी सुरू केली असून, गुरुवारी व्यापक बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचलंत का?

Back to top button