...त्यादिवशी एकनाथ शिंदेंना त्यांची चूक लक्षात येईल : जयंत पाटील | पुढारी

...त्यादिवशी एकनाथ शिंदेंना त्यांची चूक लक्षात येईल : जयंत पाटील

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सरकारमध्ये अस्वस्थता आहे, प्रशासनावरील सरकारची पकड ढिली झाली आहे, शिवसेनेतून गेलेले अनेक आमदारही नाराज आहेत, त्यामुळे सरकार फार दिवसाचे नाही हे प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. भाजपच्या कॅल्क्यूलेशन प्रमाणे जेव्हा त्यांचे गणित बसायला लागेल. त्यावेळी ते सरकार बरखास्त करतील, त्यावेळी आपण किती मोठी चूक केली, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या लक्षात येईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी औरंगाबाद येथे केले.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची आढावा बैठक औरंगाबाद येथे झाली. त्यावेळी जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी पाटील म्हणाले की, लवकरच सरकार कोसळेल, असे मी म्हणनार नाही, मात्र सरकारमध्ये अस्वस्थता आहे, सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे की, हे सरकार फार दिवसाचे नाही. सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही, राज्य सरकारने ४० आमदारांसाठी संपूर्ण महाराष्ट्र वेठीस धरला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि महाविकास आघाडी याबद्दल पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी एकसंघ राहवी, यासाठी आमची प्राथमिकता आहे. प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना आणि काँग्रेसच्या लोकांशी बोलावे व स्थानिक परिस्थितीवर अवलंबून आघाडी करावी, अशी आमची भूमिका आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करण्याच्या आमच्या स्थानिक नेत्यांनाही सुचना केल्याचे त्यांनी सांगितले.

सीतारामण महागाई, बेरोजगारीवर प्रबोधन करतील

भाजपचे मिशन बारामती आणि मतदारसंघात येत असलेल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यावर बोलताना पाटील म्हणाले की, देशामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेली बेरोजगारी, कराचे प्रमाण, महागाई या विषयी निर्मला सीतारामण या प्रबोधन करतील, अशी आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री स्क्रीप्टचे गुलाम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषण वाचून दाखवतात, कुणीतरी त्यांना सांगितले जाते की, या सभेत असे बोला, त्या सभेत तसे बोला, स्क्रीप्टचा गुलाम स्क्रीप्टच्या बाहेर जाणार नसेल, तर राजकारणात फारशी मजा नाही, अशी टीकाही पाटील यांनी केली.

मराठवाडा, नाशिकचा आढावा घेणार

जिल्ह्यात पक्षाचे क्रियाशील सभासद आणि प्राथमिक सभासद नोंदणीचे काम सुरु आहे. त्याला गती देण्यासाठी जयंत पाटील यांनी औरंगाबाद, जालना जिल्ह्याचा आढावा घेतला. यानंतर संपूर्ण मराठवाडा दौऱ्यानंतर नाशिक येथेही आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button