औरंगाबाद: नाथसागर धरणातून १ लाख क्युसेक विसर्ग सुरू; विद्युत पंप काढण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ | पुढारी

औरंगाबाद: नाथसागर धरणातून १ लाख क्युसेक विसर्ग सुरू; विद्युत पंप काढण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये वरील धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक येत आहे. त्यामुळे शनिवारी (दि.१७) सायंकाळी गोदावरी नदीत १ लाख १३ हजार १८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, नदी काठावरील नागरिकांना आपातकालीन पथकाने योग्य माहिती न दिल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक नॉट रीचेबल असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या दोन दिवसापासून नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे ९९ टक्के धरण भरले आहे. त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने गोदावरी नदीत नदीत विसर्ग करण्याचे नियोजन केले जात आहे. आज सायंकाळी पहिल्यांदाच १ लाख १३ हजार १८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीत सोडलेल्या विद्युत पंप काढून घेण्यासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे, सहायक अभियंता बंडू अंधारे, गणेश खराडकर धरणातून होणाऱ्या विसर्गावर लक्ष ठेवून आहेत. प्रथम ९ आपातकालीन दरवाजे ४ फूट खुले केले असून १८ दरवाजे ४ फूट उंचीवर उघडले आहेत. दरम्यान, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक गावांमध्ये उपलब्ध नसल्यामुळे विसर्गाबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी नागरिकाची तारांबळ उडाली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button