Ajit Pawar : आम्ही सत्तेत असतो, तर वेदांत प्रकल्प जाऊ दिला नसता : अजित पवार | पुढारी

Ajit Pawar : आम्ही सत्तेत असतो, तर वेदांत प्रकल्प जाऊ दिला नसता : अजित पवार

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रात शिंदे सरकार येऊन जवळपास ९० दिवस झाले आहेत. तरी राज्याचा कारभार सुरळीत सुरू झालेला नाही. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय रद्द करण्याचे काम हे सरकार करत आहे. जर राज्यात आमचे सरकार असते, तर वेदांत प्रकल्प आम्ही राज्याबाहेर जाऊ दिला नसता, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि.१७)  येथे सांगितले. माजलगाव शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार राज्याला प्रगतीपथाकडे घेऊन जात असताना हे सरकार पाडण्याचे महापाप भाजपने केले. आघाडी सरकारने राज्याच्या हिताचे घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा शिंदे सरकारने सुरू केला आहे. वेदांत प्रकल्पाला पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले वातावरण असताना शिंदे- फडणवीस सरकारने दिल्लीच्या इशाऱ्यावर हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. त्यामुळे राज्यातील लाखो तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे महापाप या सरकारने केले आहे,असा घणाघाती हल्ला पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारवर केला.

दुसरा नवीन प्रकल्प आणण्याच्या नुसत्या वल्गना केल्या जात आहेत. जर राज्यात आमचे सरकार असते, तर आम्ही हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊच दिला नसता, असे अजित पवार यावेळी म्हणाले. यावेळी आमदार प्रकाश सोळंके, माजी मंत्री धनंजय मुंडे, बाबुराव पोटभरे, आमदार संदीप क्षीरसागर, अशोकराव डक, संभाजी शेजुळ, अमरसिंह पंडित यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button