

मडगाव : मडगावात घडलेल्या राजकीय घडामोडींची गंभीर दखल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली. त्यांनी तातडीने भाजपच्या पंधराही नगरसेवकांना पणजीत पाचारण केले होते. यावेळी ज्यांना कोणाला एकनिष्ठ राहायचे नाही, त्यांनी पक्ष सोडून जावे. कोणत्याही परिस्थिती गद्दारी खपवून घेणार नसल्याचा सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी या नगरसेवकांना दिला.
नाव उघड न करण्याच्या अटीवर काही नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, पणजीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्येक नगरसेवकांशी चर्चा केली. त्यानंतर सर्वांशी एकत्रित चर्चा केली. या चर्चेत त्यांनी बंडखोर नगरसेवकांना सज्जड दम दिला. पत्रकारांशी बोलताना भाजप गटाचे अध्यक्ष रुपेश महात्मे यांनी, आमच्याच लोकांनी आमचा घात केला. दोन दिवस शांत राहू आणि नंतर पुढील दिशा ठरवू, असे सांगितले. दरम्यान, दोन दिवसानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते, अशी माहिती एका नगरसेवकाने दिली. दिगंबर कामत गटाचे 7 नगरसेवक व भाजपचे 8 नगरसेवक यांना तातडीने शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या बंगल्यावर बोलावून घेतले होते. सुमारे अडीच तास त्यांच्यात चर्चा झाली. त्यात मंडळाचे अध्यक्ष रुपेश महात्मे यांचा ही समावेश होता. दोन दिवसांत अविश्वास ठरावाची प्रक्रिया? विरोधात मतदान झाल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्येकांशी स्वतंत्र चर्चा केली आहे. नगरसेवक महेश आमोणकर यांना काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला असता रूपेश महात्मेच बोलतील, असे सांगून त्यांनी काढता तिथून पाय घेतला. दोन दिवसानंतर अविश्वास ठराव मांडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे समजते.