

बिडकीन; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आज प्रथमच पैठण तालुक्यात दाखल झाले. एकनाथांच्या प्रतिष्ठाननगरीत एकनाथ शिंदे यांचे औरंगाबाद ते पैठण रस्त्यावर जागोजागी जल्लोषात स्वागत करण्यात आले.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे जल्लोषी स्वागत झालेल्या बिडकीनमध्ये शिंदे यांचे त्याहून मोठे स्वागत घडवून आणत रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी 'गणेशोत्सवानंतर दाखवून देईल' हा आपला शब्द खरा करून दाखवला.
पैठणकडे रवाना झाल्यानंतर रस्त्यात जागोजागी त्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे चितेगावमध्ये पोहोचताच फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांच्या ताफ्याचे स्वागत करण्यात आले. तेथे आधी गाडीतच उभे राहून त्यांनी रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या जनतेला अभिवादन केले. काही वेळाने ते गाडीतून उतरले. त्यानंतर त्यांचे औक्षण करण्यात आले. मग व्यासपीठावर जाऊन पुन्हा त्यांनी सत्कार स्वीकारले. त्यानंतर ते बिडकीन – पैठणकडे रवाना झाले.
दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बिडकीनमध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे मोठे स्वागत झाले होते. भुमरे यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडल्याने सगळ्यांना आश्चर्य वाटले होते. त्यातच नंतर भुमरे यांच्या पैठणमधील सभेला खूपच कमी लोकांची उपस्थिती राहिल्याने उद्धव ठाकरे गट आनंदी झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री आल्यावर माझी मतदारसंघातील ताकद दाखवून देईल, असे भुमरे यांनी म्हटले होते. आज त्यांनी हा शब्द खरा करून दाखवला.
बिडकीनमध्ये आदित्य ठाकरे यांचे स्वागत झाले. त्याच ठिकाणी आज एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी क्रेनच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली.
हेही वाचलंत का ?