डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महागडा टी-शर्ट परिधान करुन पदयात्रेत सहभाग दाखविल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. यामुळे संतप्त झालेल्या कल्याणमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या मुलाचा महागडा टी-शर्ट असलेली छबी बॅनरवर झळकावून भाजपाच्या टीकेला जशास तसे उत्तर दिले आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर रविवारपासून तीन दिवसांच्या कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मंत्री ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली. यानंतर काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मंत्री ठाकूर यांच्या मुलाचे महागडे टी-शर्ट घातलेले बॅनर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 लाखांच्या सूटची छबी कल्याण शहराच्या विविध भागातील बॅनरवर झळकावून भाजपाच्या टीकेला जशास तसे उत्तर दिले.
कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पोटे आणि विमल ठक्कर यांनी हे बॅनर लावले आहेत. केंद्र सरकारचा निषेध करत हे बॅनर लावले आहेत. परंतु या बॅनरवर भाजपच्या अन्य बडया नेत्यांचे फोटो लावले नाहीत त्यामुळे हात राखून ही टीका केली आहे का, असा सवाल भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, महिलांची असुरक्षितता असे अनेक गंभीर विषय असताना या विषयावर लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाने लोकांची दिशाभूल करणारे विषय पुढे आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा काँग्रेसकडून निषेध केला जात असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि विमल ठक्कर म्हणाले.
भारत जोडो यात्रेत टुकडे-टुकडे गँगचा सहभाग, भारत तोडणारे भारत जोडो यात्रा काढत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना केल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या भूमिकांचा निषेध केला आहे.
हेही वाचा