पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. दुखापतीमुळे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला मुकलेल्या भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बहुमराह आणि हर्षल पटेल यांची निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघातील १५ खेळाडूंची निवड केली आहे. दुखापतीमुळे अष्टपैलू रवींद्र जडेजा या स्पर्धेला मुकला आहे.
ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया मैदनात उतरेल. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी निवडलेला संघ पुढीलप्रमाणे : रोहित शर्मा ( कर्णधार ), केएल राहुल ( उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिपक हुड्डा, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक ( यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून सावरले आहेत. त्यामुळे ते संघात परतील अशी शक्यता व्यक्त होत होती. त्यांनी फिटनेस टेस्टमध्येही विनाअडथळा गोलंदाजी केली होती. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया येथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेला 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.
जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल हे दोघे वेगवान गोलंदाज तंदुरुस्त होऊन संघात परतले असतानच अष्टपैलू रवींद्र जडेजा या वर्ल्डकपमध्ये खेळणार नसल्याचे निश्चित झाले आहे. रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यावर यशस्वी ऑपरेशन झाले आहे. या शस्त्रक्रियेमुळे जडेजा टी-20 विश्वचषकापर्यंत ठीक होणार नसल्याने स्पष्ट झाल्याने तो या स्पर्धेला मुकला आहे.
स्टँडबाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर