परभणी : एसपी मीनांचे पोलीस प्रशासनावर नियंत्रण नसल्यानेच जिल्ह्याची वाटचाल ‘बिहार’कडे : आ. गुट्टे | पुढारी

परभणी : एसपी मीनांचे पोलीस प्रशासनावर नियंत्रण नसल्यानेच जिल्ह्याची वाटचाल 'बिहार'कडे : आ. गुट्टे

गंगाखेड : पुढारी ‍‍वृत्तसेवा : परभणी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांचे जिल्हाभरातील पोलीस प्रशासनावरील नियंत्रण सुटल्यानेच खून, बलात्कारांसारखे प्रकार परभणी जिल्ह्यात घडत आहेत. परभणी व सेलूमधील घटना पाहता जिल्ह्याची वाटचाल ‘बिहार’कडे होत असल्याचा घणाघाती आरोप गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी एसपी जयंत मीना यांच्यावर केला आहे.

बुधवारी दि. ७ सप्टेंबर रोजी परभणी येथे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गणेशराव रोकडे, ॲड. संदीप अळनुरे, सचिन देशमुख, माधवराव गायकवाड, बाळासाहेब रोकडे, रवी कांबळे यांच्यासह पीडित कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस प्रशासनाने संबंधित कुटुंबास भेटू दिले नसल्याची माहिती आमदार गुट्टे यांनी ‘दै. पुढारी’शी बोलताना दिली. परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकवार टीकास्त्र सोडले असून एसपींच्या अकार्यक्षमतेमुळेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णतः बिघडली असल्याचे रत्नाकर गुट्टे यांनी म्हटले.

परभणी जिल्ह्यात एकाच दिवशी दोन मोठ्या गुन्हेगारीच्या घटना घडलेल्या आहेत. मनसेचे परभणी महानगराध्यक्ष सचिन पाटील यांचा खून व सेलू येथे एका पीडितेवर झालेला बलात्कार. जिल्ह्यात घडलेल्या दोन्ही गंभीर गुन्ह्यांच्या घटनेचा आपण निषेध व्यक्त करीत आहे. सेलू येथील पिडीतेच्या कुटुंबीयास आपण शासनदरबारी न्याय देण्याचा सर्वोपातरी प्रयत्न करणार आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा. गुन्हेगारास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आपण सरकारच्या माध्यमातून न्यायालयाकडे करणार आहोत. जिल्ह्यातील ढासाळलेली पोलीस यंत्रणात जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीस कारणीभूत असून परभणी जिल्ह्याची वाटचाल ‘बिहार’कडे होत असल्याची टीका यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ‘पुढारी’शी बोलताना केली आहे.

Back to top button