पिंपरी : मिळकत नोंदणीचा आलेख उंचावला, 11 हजार 272 नवीन मिळकती | पुढारी

पिंपरी : मिळकत नोंदणीचा आलेख उंचावला, 11 हजार 272 नवीन मिळकती

पिंपरी : पुढारी वृतसेवा :  पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात असल्याने गृहप्रकल्प मोठ्या संख्येने उभे राहत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे मिळकत नोंदणीचा आलेखही उंचावत आहे. गेल्या 5 महिन्यांत शहरात तब्बल 11 हजार 272 नव्या मिळकतींची नोंद झाली आहे. त्यातून पालिकेस दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न मिळणार आहे. सर्वांधिक 3 हजार 61 मिळकतींची नोंद वाकड भागात झाली आहे. त्यापाठोपाठ 2 हजार 145 मिळकती चिखली परिसरात, 993 मिळकती मोशीत तर, 849 मिळकती थेरगाव परिसरात वाढल्या आहेत. नव्याने नोंद झालेल्या एकूण 11 हजार 272 मिळकतींपैकी सर्वांधिक 9 हजार 800 मिळकती या निवासी आहेत. तर, 909 मिळकती बिगरनिवासी आहेत. औद्योगिक 23, मोकळ्या जमिनी 411, मिश्र मिळकती 71 आणि इतर मिळकती 58 आहेत. या नव्या मिळकतींची नोंद झाल्याने महापालिकेस दरवर्षी कोट्यवधींची उत्पन्न मिळणार आहे.

दरम्यान, 31 मार्च 2022 पर्यंत पालिकेकडे एकूण 5 लाख 71 हजार 552 मिळकतींची नोंद होती. 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2022 या पाच महिन्यांच्या कालावधीत वरील मिळकतींची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या एकूण नोंदविलेले 5 लाख 82 हजार 824 मिळकती शहरात आहेत.

घरबसल्या करता येथे मिळकतींची नोंद
शहरातील नव्या मिळकतींची नोंद घरबसल्या महापालिकेच्या ुुु.लिालळपवळर.र्सेीं.ळप संकेतस्थळावरून करता येते. त्या सुविधेचा लाभ नागरिक घेत आहेत. नव्याने खरेदी केलेल्या मिळकतींची तत्काळ नोंद करावी. तसेच, मुदतीमध्ये कर भरून मिळकतधारकांनी विविध सवलतींचा लाभ घ्यावा, असे करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
विभागीय कार्यालय क्षेत्रात वाढल्या मिळकती
विभागीय कार्यालय मिळकतींची संख्या
निगडी, प्राधिकरण 55
आकुर्डी 197
चिंचवड 285
थेरगाव 849
सांगवी 465
पिंपरीगाव 147

पिंपरी कॅम्प 7
पालिका भवन 242
फुगेवाडी, दापोडी 110
भोसरी 505
चर्‍होली 628
मोशी 993
चिखली 2,145
तळवडे 86
किवळे 1,279
दिघी, बोपखेल 218
वाकड 3,061

Back to top button