परभणी : पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

परभणी : पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

गंगाखेड; पुढारी ऑनलाईन : सोमवारी शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत गंगाखेड येथील पोलीस निरीक्षक व बीट जमादार हप्ते घेत असल्यामुळेच अवैधधंदे फोफावले आहेत. या आ. रत्नाकर गुट्टे यांच्या वक्तव्याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी आ. रत्नाकर गुट्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गंगाखेड शहर व तालुक्यातील अवैध धंद्याची लोकप्रतिनिधी म्हणून वस्तुस्थिती मांडणे, सत्य उघड केल्यामुळे गुन्हा दाखल झाला असेल तर परभणी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांचे सह पोलीस प्रशासनाची ही तर सरंजामशाही असल्याचा पलटवार आ. गुट्टे यांनी बुधवारी ‘पुढारी’शी बोलताना केला आहे.

सोमवारी शहरात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपायोजना व सूचना मांडण्यासाठी शांतता समितीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह सुधीर पाटील, आयपीएस पोलीस अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रेणिक लोढा यांच्यासह शहर व तालुक्यातील प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शहर व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याचा मुद्दा जाहीरपणे उचलत गंगाखेडच्या पोलीस निरीक्षक, बीट जमादारावर थेट हप्तेखोरीचा आरोप केल्याने वातावरण तापले होते. हप्तेखोरीच्या विषयावरून लोकप्रतिनिधी व पोलीस अधिकाऱ्यात जाहीर वाद-विवाद व खडाजंगी झाली.

प्रसारमाध्यमांसह समाज माध्यमांवर हा प्रकार जाहीरपणे उघड झाल्याने पोलिसांची प्रतिमा मधील झाल्याचे अधोरेखित करून आमदार गुट्टे यांनी शांतता समितीच्या बैठकीत विषय सोडून पोलीस दलातील अधिकारी / अंमलदारमध्ये उद्देश पूर्वक अप्रीतीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने व पोलीस दलातील व्यक्तींना त्रास होईल व जनतेमध्ये पोलिसांची प्रतिमा मलिन होईल या उद्देशाने भाषणात बोलून पोलीस दलाची प्रतिमा बदनामी केली आहे, म्हणून गंगाखेड पोलीस ठाण्यात आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात बुधवारी (दि.३०) रोजी रात्री उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हप्ते खोरीवर थेट बोट ठेवल्याने व त्यानंतर त्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केल्यानंतर आगामी काळात लोकप्रतिनिधी विरुद्ध पोलीस असा संघर्ष ऐन सणासुदीच्या काळात पहावयास मिळेल का ? अशी चर्चा सध्या शहरासह तालुक्यात व परभणी जिल्ह्यात सुरू आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून सत्य उघड केल्याने गुन्हा दाखल

कोरोना काळानंतरच्या दोन वर्षानंतर राज्यात सर्वत्र सण उत्सवाचे दिवस सुरू झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर गंगाखेड शहरासह तालुक्यात बोकाळलेले अवैध धंदे बंद केले तर ७० टक्के क्राईम आपोआपच थांबेल. या चांगल्या हेतूने मी लोकप्रतिनिधी या नात्याने पोलिसांचे सत्य उघड केले. सत्य उघड केल्यानंतर संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे माझ्या अंगावर धावून येणे हाच मुळात धक्कादायक प्रकार होता. आमदार लोकप्रतिनिधीवर पोलिस अधिकारी धावून येत असतील तर हा दडपशाहीचा उघड प्रकार आहे. जिल्ह्याचे एसपी व तालुक्यातील पोलीस प्रशासन अवैध धंद्यांना उघड सहकार्य करत आहेत. गंगाखेड पोलीस स्टेशनच्या १०० मीटरच्या हद्दीत अवैध गुटखा, हातभट्टी, देशीदारू आदी अवैध धंदे उघडपणे चालतात. असे असतानाही माझ्या अंगावर धावून येत पोलीस अधिकारी पुरावा मागत असतील तर हा दंडमशाही व सरंजामशाहीचा प्रकार आहे. मी सत्य बोललो असल्याने कितीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी मी माझ्या विधानावरून माझे हटणार नाही, अशी प्रतिक्रिया आ. गुट्टे यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढारीशी बोलताना दिली.

Back to top button