

पाथर्डी/मोहटा, पुढारी वृत्तसेवा: मोहटादेवी गड येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गर्दीचे नियोजन, दर्शन मार्ग, वाहतूक व सुरक्षा नियोजनांची आढावा बैठक झाली. उत्सवापूर्वी नियोजन करून कामांची पूर्तता करण्याचे आदेश संबंधित विभागांना आले. तहसीलदार श्याम वाडकर यांनी यात्रेसाठीच्या दक्षता व उपाययोजनांसंदर्भात सूचना दिल्या.शासकीय विभागप्रमुखांची बैठक उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षेखाली झाली. सोमवार, दि. 26 सप्टेंबर ते रविवार, दि. 9 ऑक्टोबरदरम्यान नवरात्र उत्सवात मोहटादेवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येणार. यात्रा सुरळीत पार पडावी म्हणून ही समन्वय बैठक आयोजित करून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
कायदा व सुव्यवस्था, गर्दीचे नियोजन, सुलभ दर्शनासाठी पोलिस व देवस्थान प्रशासन समन्वय ठेवून वाढीव सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितले. ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या विविध विभागांमार्फत देवीगड व परिसरातील सुविधांबाबत अधिकारी व कर्मचार्यांना गटविकास अधिकारी पालवे यांनी सूचना दिल्या. जिल्हा परिषद व पंचायत समितीचा बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग व पाथर्डी नगरपालिका हद्दीतील अतिक्रमणे, रस्त्यांची दुरुस्ती, संरक्षक कठडे आदींच्या दुरुस्त्या यात्रेपूर्वी करा, असे निर्देश उपजिल्हाधिकारी केकाण यांनी दिले. सरपंच एरिना पालवे यांनी उत्सवात महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न मांडून ग्रामपंचायतमार्फत पथदिवे, स्वच्छता केली जाईल, पार्किंगबाबत महसूल विभागाशी समन्वयाने निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली.
परिवहन महामंडळ 100 बसेेसद्वारे प्रवाशांसाठी अहोरात्र सेवा करील, अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक महेश कासार यांनी माहिती दिली. पाणीपुरवठा योजनेसाठी अखंडित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा केला जाईल. परिसरातील सर्व खांब, जोडण्या, ताण फ्यूज बॉक्स तपासणी करून ते सुस्थितीत ठेवण्यात येतील, असे महावितरणचे एस. ई. अहिरे यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार वाडकर, गटविकास अधिकारी पालवे, पोलिस निरीक्षक चव्हाण, धर्मदायचे एस. आर. मोरे, आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. घुगे, वन अधिकारी अरुण साबळे, आगार व्यवस्थापक कासार, आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, सार्वजनिक बांधकामचे मिसाळ, महावितरणचे अहिरे, देवस्थानचे विश्वस्त अशोक दहिफळे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, आजीनाथ आव्हाड, भीमराव पालवे, अशोक भ. दहिफळे, सीईओ सुरेश भणगे आदी उपस्थित होते.