बीड : लातूरमध्ये मेडिकल विद्यार्थ्यांची आत्महत्या, देवदहिफळ गावावर शोककळा | पुढारी

बीड : लातूरमध्ये मेडिकल विद्यार्थ्यांची आत्महत्या, देवदहिफळ गावावर शोककळा

धारूर (जि. बीड) : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील देवदहिफळ येथील लातूर येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भागवत सुनील बडे याने आत्महत्या केली. यामुळे देवदहीपळ गावावर शोककळा पसरली आहे. भागवत बडे हा लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. काल दिनांक ३० रोजी मंगळवारी गावाकडून तो लातूरला गेला होता. संध्याकाळी सहाच्या दरम्यान भागवत बडे याने हॉस्टेलच्या रूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळताच नातेवाईकांनी लातूर येथे धाव घेतली.

लातूर येथे त्याच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात येत आहे. त्याचे वडील सुनील बडे हे शेतकरी आहेत. अत्यंत हुशार व स्वभावाने मनमोकळा असलेल्या भागवतने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. भागवत बडे याचे शिक्षण दिंद्रुड येथे झाले असून शासकीय कोट्यातून त्याची एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली होती. कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असून भागवतच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

Back to top button