नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दुचाकींच्या क्रमांकांसाठी येत्या 1 सप्टेंबरपासून 'एमएच 15, एचझेड' ही नवीन मालिका सुरू करण्यात येणार असून, आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यात आले आहेत. या क्रमांकांसाठी शासनाने ठरावीक शुल्क विहित केलेले असून, पसंतीचा क्रमांक मिळण्याकरिता नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहन विक्रीत मोठी वाढ झाली असून, बहुतांश नागरिक आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यास प्राधान्य देतात. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कायार्लयाला विहित नमुन्यातील अर्ज दि. 1 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 दरम्यान या कार्यालयाच्या आवक-जावक विभागात जमा करणे अनिवार्य राहील. या अर्जासोबत पत्त्याच्या पुराव्याची (उदा. आधारकार्ड, वीजबिल, घरपट्टी इ.) साक्षांकित केलेली छायांकित प्रत, अर्जदाराच्या फोटो ओळखपत्राची (उदा. आधारकार्ड/निवडणूक ओळखपत्र/पासपोर्ट/पॅनकार्ड इ.) साक्षांकित छायांकित प्रत तसेच वाहन वितरकाकडे वाहन नोंदणीसाठी आधारलिंक मोबाइल क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या शुल्काची रक्कम कोणत्याही राष्ट्रीयीकृत-शेड्युल्ड बँकेचा डिमांड ड्राफ्ट प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक (आरटीओ, नाशिक) यांचे नावे काढून भरणे आवश्यक असून, अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. एकदा राखून ठेवलेला पसंती क्रमांक बदलून किंवा रद्द करता येत नाही. हा क्रमांक दुसर्या व्यक्ती/संस्थेच्या नावे हस्तांतरित करता येत नाही. तसेच, भरलेले शासकीय शुल्क कुठल्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही, असेही 'आरटीओ'तर्फे कळविण्यात आले आहे..
…. तर अर्ज होणार रद्द
एकाच क्रमांकासाठी अधिक अर्ज आल्यास अशा आकर्षक क्रमांकांची यादी कार्यालयातील नोटीस बोर्डवर त्याच दिवशी प्रदर्शित करण्यात येईल. ज्या अर्जदारांचा आकर्षक क्रमांक लिलाव प्रक्रियेसाठी समाविष्ट असेल, अशा अर्जदारांनी लिलावामध्ये भाग घेण्यासाठी दुसर्या दिवशी सायं.4 पर्यंत विहित केलेल्या शुल्काच्या रकमेच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त कोणत्याही बोलीच्या रकमेचा एकच डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करावा. ज्या अर्जदारांचा डिमांड ड्राफ्ट जास्त रकमेचा असेल, अशा अर्जदारासच पसंतीचा क्रमांक जारी करण्यात येईल. लिलावामध्ये एकापेक्षा जास्त डिमांड ड्राफ्ट सादर करणार्या अर्जदाराचा अर्ज रद्द करण्यात येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांनी दिली.