बीड: मोटारसायकल-मोपेडच्या धडकेत एक जण गंभीर जखमी | पुढारी

बीड: मोटारसायकल-मोपेडच्या धडकेत एक जण गंभीर जखमी

केज; पुढारी वृत्तसेवा : साळेगाव (ता. केज) येथील बस स्टँडवर मोटार सायकल आणि मोपेडच्या झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि.१७) दुपारी १२.३० च्या दरम्यान घडली. ज्ञानोबा अनंतराव इंगळे असे अपघातातील जखमीचे नाव आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, केज तालुक्यातील साळेगाव येथे बस स्टँडजवळील शिवाजी चौकात आज दुपारी ज्ञानोबा अनंतराव इंगळे यांच्या मोपेडला (एम एच-४४/ एक्स-१४७२) कळंबकडून येणाऱ्या मुदसिरोद्दीन मेहरोद्दीन काजी (रा. उस्मानाबाद) यांच्या मोटार सायकलने (एम एच-२५/एस-७१४१) जोराचे धडक दिली. यात ज्ञानोबा इंगळे हे गंभीर जखमी झाले.

त्यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार राजू गुंजाळ आणि हनुमंत गायकवाड घटनास्थळी दाखल झाले.

एक महिन्यातील चौथा अपघात

एक महिन्यात याच ठिकाणी चार अपघात घडले असून या महामार्गावरून एक राज्य रस्ता क्रॉस करीत आहे. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या खासगी वाहने आणि रिक्षा यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. भरधाव वाहने येत असल्याने गतिरोधक उभारण्याची मागणी होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button