बीड : विनायक मेटे यांच्या निधनाने जन्मभूमी मांजरापट्टा, बालाघाट झाला सुन्न | पुढारी

बीड : विनायक मेटे यांच्या निधनाने जन्मभूमी मांजरापट्टा, बालाघाट झाला सुन्न

बीड : मनोज गव्हाणे; शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ते ५२ वर्षाचे होते. मुंबईच्या दिशेने येताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. माडप बोगद्यात ही दुर्घटना घडली. सकाळी ५ वाजता हा अपघात झाला. अपघातात मेटे यांना हात-पाय आणि डोक्याला मार लागला होता. अपघातानंतर जवळपास तासभर मदत मिळाली नाही, खूप वेळ फोन करूनही पोलिस वेळेवर पोहोचले नाहीत, अशी माहिती मेटेंच्या सहकाऱ्यांनी दिली. मेटे यांच्या निधनाने मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला आहे.

शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांची जन्मभूमी केज तालुक्यातील नांदूरघाट पासून काही अंतरावरील राजेगाव. त्यामुळे घाटमाथ्यावर आ. विनायक मेटे यांचे विशेष लक्ष असायचे. त्यामुळेच मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी नेकनूर, चौसाळा, विडा, लिंबागणेश या ठिकाणी शिवसंग्राम विजयी केला. याच परिसरात त्यांच्या शैक्षणिक संस्था असून बालाघाटावर त्यांची पकड मोठी असल्याने निधनाचे वृत्त धडकताच परिसर सुन्न झाला. त्यांचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. बीड जिल्ह्यातील सीमेवर असणारे केज तालुक्यातील नांदूरघाट जवळील राजेगाव या मांजरा पट्ट्यातील गावाला राजकीय वारसा नसतानाही लढाऊ वृत्तीमुळे आमदार विनायक मेटे हे नाव राज्यभर पोहोचले. कामानिमित्त मुंबईत गेलेले मेटे मराठा महासंघाच्या चळवळीतून पुढे आले. मराठा आरक्षणाच्या लढाईपासून समाजासाठी लढणाऱ्या नेत्याच्या यादीत ते अग्रभागी होते. शिवसंग्रामच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेत मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत चार जागांवर मेटे यांचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. कालांतराने मात्र ते भाजपच्या गटात दाखल झाले. आमदार मेटे यांनी नेकनूर, चौसाळा, लिंबागणेश, विडा या सर्कलमध्ये जास्त लक्ष देत संपर्क वाढवला होता. याच भागात ते जिल्ह्यात आले की दाखल असायचे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी साखळी या भागात तयार झाली आहे.

आज सकाळी त्यांच्या अपघाताचे आणि निधनाचे वृत्त धडकताच बालाघाट सून्न झाला असून कार्यकर्ते, नातेवाईक मुबंईकडे रवाना झाले आहेत.

 हे ही वाचा :

Back to top button