जाहीर केलेली मदत म्हणजे, भीक नको पण कुत्रा आवर अशी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप | पुढारी

जाहीर केलेली मदत म्हणजे, भीक नको पण कुत्रा आवर अशी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : राज्यामध्ये अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी अक्षरशः जमिनी खरडून गेल्या आहेत. शासनाने जाहीर केलेली मदत म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (दि. १२) केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते दानवे शुक्रवारी नांदेड व हिंगोली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी वसमत तालुक्यात काही गावांना भेट देऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला. तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू चापके, गणेश देशमुख, अंकुश आहेर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी दानवे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतीची अतिशय विदारक परिस्थिती आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याशिवाय जमिनी देखील खरडून गेल्या आहेत. पुढील तीन ते चार वर्ष या जमिनीची पिकणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. तसेच काही ठिकाणी जनावर वाहून गेली त्यामुळे पशुपालकदेखील अडचणी सापडले आहेत. शासनाने एनडीआरएफ च्या निकषानुसार मदत जाहीर केली. मात्र मुळातच एनडीआरएफचे निकषच फसवे आणि कालबाह्य झाले आहेत.

या निकषानुसार मदत दिली तर ७५ टक्के शेतकरी मदतीपासून वंचित राहतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे नुकसानीचे सरसकट पंचनामे करून सर्व शेतकर्‍यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याची त्यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का?

Back to top button