न्यायालयात हजर रहा : सोलापूर जिल्हा न्यायालयाचे श्रीकांत देशमुखांना आदेश | पुढारी

न्यायालयात हजर रहा : सोलापूर जिल्हा न्यायालयाचे श्रीकांत देशमुखांना आदेश

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : एका महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता युक्तीवाद होणार आहे. यावेळी देशमुख यांनी उपस्थित राहावे, असे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी दिले आहेत.

माझे पत्नीसोबत मतभेद असून तिच्यापासून मागील तीन वर्षांपासून विभक्त राहत आहे. पत्नीला घटस्फोट देणार आहे, असे सांगून श्रीकांत अप्पासाहेब देशमुख (रा. जवळा, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर सोलापूर, मुंबई, पुणे, सांगोला व पीडितेच्या घरी जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. याबाबत तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान, या प्रकऱणी पीडित महिलेने प्रथमत: पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. त्यानंतर सदर गुन्हयाची सुरुवात सोलापुरातून झालेली असल्याने सदर गुन्हयाचा तपास सदर बझार पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

या प्रकरणात सदर बझार पोलिसांनी सदर आरोपी श्रीकांत देशमुख यांच्याविरुध्द भारतीय दंड विधान कलम 376, 377, 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंदवून सदर गुन्हयाचा तपास सुरु केला. दरम्यानच्या काळात आरोपी श्रीकांत देशमुख याने त्यास अटक होईल, या भितीने 22 जुलै 2022 रोजी सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे म्हणणे दाखल करुन जामीन अर्जास तीव्र विरोध दर्शविला. आरोपी हा राजकीय पार्श्वभूमीचा असल्याने व तो भारतीय जनता पक्षाचा माजी जिल्हा अध्यक्ष असल्याने जामीन अर्ज मंजूर झाल्यास तो पळून जाण्याची दाट शक्यता असल्याने व तसे झाल्यास पोलिसांना गुन्हयाचा तपास करणे अशक्यप्राय होईल, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच आरोपी जामीन अर्जाच्या युक्तीवादावेळी न्यायालयात हजर राहणे गरजेचे असल्याचे युक्तीवादातून सांगितले. सदर अर्जावर आरोपीच्या वकिलाने हरकत घेवून म्हणणे दिले. तरीदेखील सरकार पक्षाने केलेला युक्तीवाद व सदर प्रकरणातील पीडित महिलेने तिचे प्रतिज्ञापत्र दाखल करुन आरोपीकडून वारंवार तक्रार मागे घेण्याबाबत धमक्या येत असल्याचे व तिच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले आहे. या बाबीं न्यायालयाने विचारात घेवून सदर प्रकरणात श्रीकांत देशमुख यांना 16 ऑगस्टरोजी दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अॅड. प्रदिपसिंग रजपूत हे काम पाहत आहेत. तर फिर्यादीतर्फे अ‍ॅड. महेश जगताप व विदयावंत पांढरे हे काम पाहत आहेत. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. मिलींद थोबडे, अॅड. बाबासाहेब जाधव हे काम पाहत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button