परभणी : जिंतूर तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग; इटोली-येलदरी मार्ग बंद | पुढारी

परभणी : जिंतूर तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग; इटोली-येलदरी मार्ग बंद

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : या वर्षी सुद्धा जिंतूर तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. गुरुवारी (दि.२८ जुलै) पडलेल्या जोरदार पावसाने तालुक्यात नदी, नाले व ओढे तुडुंब भरल्याने समाधानकारक चित्र आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्यामधून देखिल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे येलदरी ईटोली मार्ग प्रभावित झाल्याचे पहावयास मिळाले. इटोली जवळ पुलावर पाणी आल्याने अनेक गावांचा तालुक्यांशी असणारा संपर्क तुटला होता. सध्या येलदरी धरण ६४ टक्क्यांपर्यंत भरले आहे.

गुरुवारी जिंतूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने येलदरी ईटोली मार्ग प्रभावित झाला. कारण इटोली जवळील कमी उंची असलेला पुलावरून पाणी जात असल्याने या मार्गावरील येलदरी, मुरूमखेडा, सावळी, गणेश नगर तांडा, निलज, दिग्रस, दाभा आदी गावातील ग्रामस्थांना येलदरी – जिंतूर मार्गासाठी हा इटोली जवळील पूलावरून पाणी जात असल्याने अडचणीचा सामाना करावा लागला. दरवर्षी हा प्रश्न उपस्थित होत असल्याने जास्त पाऊस कोसळला की हिवरखेडा व ईटोली जवळील पुला वरून पाणी गेले की संबधीत गावकऱ्याचा अन्य गावा सह जिंतूर शहरांशी संपर्क तुटतो, तेंव्हा प्रशासनाने या पुलांची उंची वाढवावी अशी मागणी इटोलीच्या राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा मनीषा केंद्रे सह सावळी येथील, संदीप घुगे, मदन घुगे केहाळकर आदींनी केली आहे.

सध्या मराठवाड्यातील दुसऱ्या नंबरचे मातीचे धरण असलेले जिंतूर तालुक्याचे वैभव येलदरी धरण हे आजघडीला 64 टक्के भरले असून पुढील महिन्यात सदर धरण 100 टक्के भरेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे.

Back to top button