AUS W vs IND W : भारताचा विजयाचा घास ऑस्ट्रेलियाने हिरावला | पुढारी

AUS W vs IND W : भारताचा विजयाचा घास ऑस्ट्रेलियाने हिरावला

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 3 गडी राखून पराभव करून स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार हरमनप्रीत कौर (52) हिच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने कांगारूंसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने ही धावसंख्या 6 चेंडू बाकी असताना गाठली. ऑस्ट्रेलियाकडून गार्डनरने (52*) नाबाद अर्धशतक झळकावत भारताच्या तोंडून विजय हिसकावून घेतला.

155 धावांचा बचाव करताना रेणुका सिंगने टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली आणि कांगारूंनी 34 धावांवर चार विकेट गमावल्या. यानंतर रेचेल हेन्सला दीप्ती शर्माने 49 धावांवर बाद केले. त्यावेळी भारत हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण नंतर गार्डने आणि ग्रेस हॅरिस (37) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर त्यांनी सामन्यात पुनरागमन केले. शिवाय संघाला विजय मिळवून दिला. अखेरीस अलाना किंगने 16 चेंडूत 18 धावांची शानदार खेळी केली.

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 52 धावा केल्या. शफाली वर्माने 48 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनासिनने चार विकेट घेतल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत हरमनप्रीतने 34 चेंडूंचा सामना केला आणि 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. 20व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ती बाद झाली. त्याचवेळी शेफाली वर्माने 33 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. तिने 9 चौकार मारले.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांची अवस्था 4.1 षटकांत 4 गडी बाद 34 धावा अशी झाली होती. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरने या चार फलंदाजांना माघारी धाडले. तिने पहिल्याच षटकात एलिसा हिलीला बाद केले. रेणुकाने आपल्या दुसऱ्या षटकात ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लेनिंग (8) आणि बेथ मुनी (10) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तिने तिसर्‍या षटकातील पहिल्या चेंडूवर ताहलिया मॅकग्राला (14) बोल्ड केले. त्यानंतर दीप्ती शर्माने रॅचेल हेन्सची (9) विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 23 सामने खेळले गेले आहेत. भारताने केवळ 6 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने 16 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. गेल्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्येही भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाने तो सामना 85 धावांनी जिंकत विश्वचषकावर कब्जा केला होता.

ऑस्ट्रेलिया महिला प्लेइंग इलेव्हन :

अॅलिसा हिली (विकेटकीपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, रॅचेल हेन्स, अॅशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन

भारतीय महिला प्लेइंग इलेव्हन :

स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंग, रेणुका सिंग

Image

Back to top button