परभणी : मानवतला आठ दिवसांत दोन दुकाने चोरट्यांनी फोडली

मानवतला दोन दुकानांमध्ये चोरी
मानवतला दोन दुकानांमध्ये चोरी

मानवत : पुढारी वृत्तसेवा : शहरात परत एकदा चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. या आठवड्यात चोरट्यांनी शहरातील २ दुकाने फोडून पन्नास हजार रुपयांची चोरी केलीय. अन्य २ ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी ता. २५ रोजी मध्यरात्रीनंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळाजवळ असलेल्या हरी विठ्ठल स्वस्त औषधी सेवा या मेडिकल दुकानात चोरी झाली. दुकानावरील पत्रा कापून दुकानात अनधिकृत प्रवेश करून दुकानातील नगदी रुपयांसह साहित्य असा एकूण २५ हजार ६६० रुपयांची ऐवज लंपास केला.

सखाराम नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या आठवड्यातच १९ जुलैच्या मध्यरात्री शहरातील भाजी मंडई परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या कोथाळकर यांच्या किराणा दुकानाची मागची बाजूची भिंत फोडून दुकानाच्या गल्ल्यातील २५ हजार रुपयांची चोरी झाली होती.

तसेच शहरातील रचना कॉलनीत राहणारे डॉ. जितेंद्र वर्मा यांच्या बंगल्यातदेखील चोराने घुसण्याचा प्रयत्न झाला होता. हा प्रकार त्यांच्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आला . १० जुलैच्या रात्री १ च्या सुमारास कापड बाजारातील दत्तप्रसाद बांगड यांच्या दुकानासमोर चोरटा आला असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे .

सीसीटीव्ही कॅमेरे बनले शोभेची वस्तू

मानवत शहरात येथील नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरात प्रमुख अनेक ठिकाणी गतवर्षी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. येथील पोलीस स्टेशनला सुपूर्द केले आहेत. परंतु, या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखभाल कोणी करायची या वादातच सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. ते शोभेची वस्तू बनले असल्याचेही दिसून येत आहे. सदरील सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news