

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा रस्त्यावरील कोंढणपूर फाटा उड्डाणपुलावर मंगळवारी (दि. 26) मध्यरात्री दीडच्या सुमारास एक दुचाकी दुभाजकाला धडकून एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. मेहुल जीवराम प्रजापती (वय 18, रा. गंज पेठ, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या वेळेस मेहुल जीवराम प्रजापती व त्याचा मित्र प्रज्ञेश संगम उमरदंड (वय 18, रा. 502, गणेश पेठ, घसेटी पूल, पुणे) हे दोघे खेड शिवापूरहून पुण्याला जात होते.
या वेळी श्रीरामनगर हद्दीतील कोंढणपूर फाटा येथील उड्डाणपुलावर आले असता दुचाकीवरिल नियंत्रण सुटून रस्त्याच्या दुभाजकाला त्यांची मोटारसायकल (एमएच 12 टीएक्स 9707) धडकून अपघात झाला. त्यामध्ये मेहुल प्रजापती हा जागीच ठार झाला, तर प्रज्ञेश उमरदंड हा जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत अमोल सूर्यवंशी यांनी फिर्याद दाखल केली असून, राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राहुल कोल्हे तपास करीत आहेत.