नितीन गडकरी यांनी मानले शिवसेनेचे आभार | पुढारी

नितीन गडकरी यांनी मानले शिवसेनेचे आभार

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या शिवसेनेच्या निर्णयाचे स्वागत आहे. याबद्दल मी शिवसेनेला धन्यवाद देतो, असे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (दि.१३) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गुरूपौर्णिमेनिमित्त गडकरी यांनी मिटमिटा येथील मच्छिंद्रनाथ मंदिरात पूजा करून आपल्या अध्यात्मिक गुरूंचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. द्रौपदी मूर्म यांना पाठिंबा देण्याच्या शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष वेधले असता, याबद्दल आपण शिवसेनेला धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद- पुणे रस्ता २६८ कि.मी. लांबीचा

आजच्या बैठकीत औरंगाबाद – पुणे या नव्या ग्रीनफिल्ड रस्त्याचे अलायमेंट निश्चित करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले. हा द्रुतगती महामार्ग सहापदरी व २६८ कि.मी. लांबीचा असेल. बीड व नगर जिल्ह्यातून हा महामार्ग जाईल. पुढे हा रस्ता पुणे – बंगळूर महामार्गाशी जोडला जाईल. त्यामुळे औरंगाबाद- पुणे – बंगळूर मार्गाद्वारे औरंगाबाद चेन्नईशी जोडले जाईल,असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

पंकजांनी टाळला मंत्रिपदाचा प्रश्न

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यादेखील यावेळी उपस्थित होत्या. शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळात आपणास स्थान मिळण्याची शक्यता आहे का, अशी विचारणा केली असता, त्यांनी उत्तर दिले नाही. उद्धव ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाबद्दल काहीच पावले उचलली नव्हती. नवे सरकार ओबीसी हिताचे असल्याने ओबीसींना राजकीय आरक्षण पूर्ववत मिळेल, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

Back to top button